लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. दुग्ध सहकारी संस्था गटातून राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते सुनिल फुंडे यांनी त्यांचा ४४ मतांनी पराभव केला. फुंडे यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सहकार पॅनलला ११ जागा मिळाल्या, तर, काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे आणि आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनलला फक्त ४ जागा मिळाल्या. यामुळे आता सुनिल फुंडे यांचा अध्यक्षपदाचा मार्ग दुसऱ्यांदा मोकळा झाला आहे. असे असले तरी, न्यायालयाच्या निर्णयामुळे ५ गटामधील ६ जागांचा निकाल रोखून ठेवण्यात आला आहे.
२१ संचालकपदासाठी ही निवडणूक २७ जुलैला घेण्यात आली होती. यात महायुतीचे सहकार पॅनल आणि काँग्रेसचे परिवर्तन पॅनल रिंगणात होते. विविध २० गटांमधून ४६ उमेदवार मैदानात होते. मतदार यादीवर घेतलेल्या आक्षेपावरून मतदानाच्या आदल्या दिवशी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पाच गटातील निकाल पुढील निर्णयापर्यंत रोखून ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ५ गटांमधील ६ जागांचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले नाहीत.
पोलिस कल्याण सभागृहात सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. सकाळी ११ वाजता १५ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक शुद्धोधन कांबळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश जीभकाटे आणि राजू अगडे यांनी जबाबदारी सांभाळली. निकालाची उत्सुकता असल्याने पोलिस मैदानावर मोठी गर्दी उसळली होती. निकाल जाहीर होताच गुलाल उधळून आणि पेढे वाढून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पोलिस बंदोबस्तही चोख होता.
काँग्रेसच्या गटाला हादरा सहकार क्षेत्रातील या निवडणुकीने काँग्रेसला जोरदार हादरा दिला आहे. दुग्ध सहकारी संस्था गटातून खुद्द खासदार प्रशांत पडोळे उमेदवार होते. आमदार नाना पटोले हे सुद्धा पॅनलच्या विजयासाठी प्रचारात उतरले होते. मात्र या दोन्ही दिग्गजांची ताकद पॅनलला वाचवू शकली नाही.
आम्ही आत्मचिंतन करू - नाना पटोलेया निकालासंदर्भात आमदार नाना पटोले यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, मिळालेला कौल आम्ही स्वीकारतो. मात्र यातून आम्ही आत्मचिंतन करू. विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असावी, धानाला बोनस दिला असावा, सर्व प्रश्न सोडविले असावे; त्यामुळेच शेतकरी मतदारांनी आम्हला नाकारून येथे महायुतीला मतदान केले असावे, असे उपरोधिक वक्तव्यही त्यांनी केले.
हा विजय २१ वर्षात शेतकऱ्यांच्या झालेल्या सन्मानाचा - सुनिल फुंडे २१ वर्षापासून आम्ही सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले. त्यांचा कायम सन्मान केला, हा विजय त्या कामाची पावती आहे. या विजयाचे श्रेय खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार राजू कारेमोरे यांना आहे. भविष्यात बँकेची सर्वांगिण प्रगती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी करण्यासाठी आम्ही सारे कटीबद्ध आहोत.