घडाईपेक्षा मढाईच अधिक
By Admin | Updated: November 24, 2015 00:39 IST2015-11-24T00:39:55+5:302015-11-24T00:39:55+5:30
अड्याळमध्ये कधी नव्हे इतक्या प्रमाणात धान पिकावर किडीने आक्रमण केले.

घडाईपेक्षा मढाईच अधिक
व्यथा शेतकऱ्यांची : बळीराजा सापडला आर्थिक संकटात
विशाल रणदिवेअड्याळ
अड्याळमध्ये कधी नव्हे इतक्या प्रमाणात धान पिकावर किडीने आक्रमण केले. हातचे पिक जाऊ नये, यासाठी येथील शेतकऱ्यांनी तन मन धन पणाला लावले तरीही पालथ्या घागरीवर पाणी पडल्यासारखे शेवटी डोळ्यात भरणारे पिक अश्रू देऊन गेला. अड्याळमध्ये कुणाला एकरी २ पोते, ५ पोते आलेच तरी सुधारित पैसेवारी ६५ पैसे दाखविली आहे.
५० टक्क्यापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यांना दुष्काळाचे लाभ देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त यादीतून बेपत्ता आहे. अड्याळ गावाची सुधारित पैसेवारी ६५ ठळक अक्षरात दाखविली आहे. पैसेवारीचे आकडे गावातील पिक परिस्थिती समाधानकारक असल्याचे सांगत असले तरी वास्तव मात्र वेगळेच आहे. आजही आणेवारी काढण्याची पद्धत जुनीच आहे. त्यामुळे खरे चित्र कागदावर दिसत नाही.
अड्याळमध्ये दर्शविलेल्या पैसेवारीनुसार पिकपरिस्थितीनुसार शेतकऱ्यांची ओरड सुरूच आहे परंतु या हाकेला धावणारे नेतृत्व करणारे उपलब्ध होत नसल्याने येथील शेतकरी नुसता गरजत आहे परंतु बरसला नाही. पिक परिस्थिती समाधानकारक असती तर एवढी ओरड खरचं असती का त्यामुळे सरकारी यंत्रणा खरच किती गंभीर आहे यावरून लक्षात येते.
धान उत्पादकांचा खंबीर वालीच शोधूनही सापडत नसल्यामुळे येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध सोयी सवलती पदरात पाडून धानाला उत्पादन खचाृवर आधारित भाव मिळण्यासाठी शासनदरबारी भांडणाच्या दमदार नेतृत्वाची आज गरज आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्ष नेते मंडळींनी शेतकरी हिताची ग्वाही दिली. आज इथे यायला शेतकऱ्यांची अवस्था जाणून घ्यायलाही या लोकप्रतिनिधींकडे वेळ नाही. किडीने शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावला आहे. कधी ओला तर कधी कोरडा, रोगराई आणि सिंचनाची सोय नसल्याने अनेकदा शेतकऱ्यांना पिक घेताना सामोरे जावे लागत आहे. यावर शासनाने वेळीच उपाययोजना करून त्यांना आर्थिक मोबदला द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.