आमदारांनी साधला गवराळा येथील कुटुंबांशी संवाद

By Admin | Updated: August 27, 2016 00:20 IST2016-08-27T00:20:44+5:302016-08-27T00:20:44+5:30

प्रत्येक कुटुंबांनी उघड्यावर शौचास न जाता शौचालयाचा वापर करणे आवश्यक आहे.

The MLAs conducted a dialogue with the families of Guarala | आमदारांनी साधला गवराळा येथील कुटुंबांशी संवाद

आमदारांनी साधला गवराळा येथील कुटुंबांशी संवाद

कुटुंब संवाद अभियानाला प्रारंभ : अधिकारी, पदाधिकाऱ्यांसाठी गृहभेटीतून स्वच्छतेचा संदेश
लाखांदूर : प्रत्येक कुटुंबांनी उघड्यावर शौचास न जाता शौचालयाचा वापर करणे आवश्यक आहे. स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबांना स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करण्याची संधी प्राप्त झाली आहे. २२ आॅगस्टपासून प्रारंभ झालेल्या कुटुंब संवाद अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी भेटीगाठी घेवून प्रत्येक गाव हागणदारीमुक्त करावा, असे आवाहन आमदार बाळा काशीवार यांनी केले. कुटूंब संवाद अभियानांतर्गत लाखांदूर पंचायत समितीमधील गवराळा येथे स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व शौचालय उपलब्ध नसलेल्या कुटुंबांच्या गृहभेटी घेवून स्वच्छतेबाबत संदेश दिला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी गटविकास अधिकारी डी.एम. देवरे, पंचायत समिती सभापती, मंगला बगमारे, पंचायत समिती सदस्य देशकर, अलका मेश्राम, सरपंच सुनिता राऊत, उपसरपंच प्रकाश राऊत, वित्त नि संपादणूक अधिकारी बबन येरणे, विस्तार अधिकारी मेंढे, सचिव नाकाडे, ग्रा. प. सदस्य जनपाल दोनाडकर, विनायक राऊत, मुक्ता खरकाटे, भावना मेश्राम, गट समन्वयक त्रिरत्ना उके, समुह समन्वयक जगदीश तरेकार, चेतन मेश्राम यांची उपस्थिती होती.
आमदार बाळा काशीवार पुढे म्हणाले, गाव स्वच्छ व सुंदर करून गावातील वातावरण आल्हाददायक निर्माण करायचे आहे. याकरिता स्थानिक पदाधिकारी, कर्मचारी संघटीतपणे जेव्हा कार्य करतील तेव्हा आपल्या स्वप्नातील गाव घडविता येईल. संपूर्ण लाखांदूर तालुका हा सन २०१६-१७ मध्ये हागणदारीमुक्त करायचा आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी संयुक्तपणे येवून स्वच्छतेसाठी कार्य केले तर लाखांदूर तालुका ठरलेल्या वेळेत हागणदारीमुक्त करता येईल, अशा आशावाद व्यक्त केला. तसेच इतर योजनांची माहिती देत लाभ घेण्याचे आवाहन केले.
स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिकांना मार्गदर्शन केल्यानंतर आमदार काशीवार यांनी गावात गृहभेटी केल्या. ज्या कुटूंबाकडे शौचालय नाही त्यांच्या घरांना लाल रंगाचे धोका खतरा असलेले स्टिकर्स लावून स्वच्छता आपल्या कुटूंबासाठी किती महत्वाची आहे. याबाबत जाणीव करून दिली. तसेच ज्या कुटूबांनी शौचालयाचे बांधकाम केले त्या कुटूंबाकडेही गृहभेटी देवून कुटूंबातील सगळ्या सदस्यांनी उघड्यावर हागणदारीला न जाता शौचालयाचे बांधकाम करून वापर करण्याचा सल्ला दिला. गट विकास अधिकारी देवरे यांनी २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर १६ पर्यंत राबविण्यात येत असलेल्या कुटूंब संवाद अभियानाच्या माध्यमातून शौचालय बांधकाम करण्यासाठी उत्साहाचे वातावरण तयार करण्याचे आवाहन केले. स्थानिक पदाधिकारी यांचे सहकार्याने शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी कुटूंबांच्या भेटी गाठी घेवून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे आवाहन करीत संपूर्ण लाखांदूर तालुका माहे डिसेंबर २०१६ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार केला. कुटूंब संवाद अभियानाच्या माध्यमातून आमदार, बिडीओ, सभापती, पं.स. सदस्य, ग्रा.पं. पदाधिकारी यांनी गावातील कुटूंबाकडे जावून शौचालय बांधकाम व वापर करण्यासाठी आग्रह केला. तसेच लगतच्या खैरीपट येथे कुटूंबांच्या भेटी गाठी घेवून आवाहनपत्राच्या माध्यमातून शौचालय बांधकाम करण्यासाठी आवाहन केले. शौचालय असलेले व नसलेल्या कुटूंब जावून संवाद साधण्यात आला. यावेळी उपसरपंच योगेश ब्राम्हणकर, सचिव तलमले, तंटामुक्त अध्यक्ष विनायक कामटकर, ग्रा.पं. सदस्य राजेश देशमुख व पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The MLAs conducted a dialogue with the families of Guarala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.