नोकरीचे आमिष देऊन गंडविले
By Admin | Updated: July 19, 2015 00:49 IST2015-07-19T00:49:47+5:302015-07-19T00:49:47+5:30
येथील नतून महाराष्ट्र विद्यालयात शिक्षकाची नोकरी देण्याचे आमिष देऊन पाच लाख रूपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार ..

नोकरीचे आमिष देऊन गंडविले
मारण्याची धमकी : पोलिसात तक्र ार देऊनही कारवाई नाही
भंडारा : येथील नतून महाराष्ट्र विद्यालयात शिक्षकाची नोकरी देण्याचे आमिष देऊन पाच लाख रूपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार भंडारा पोलीस ठाण्यात केली. परंतु, पोलिसांनी अद्याप कारवाई केली नाही. संबंधितांविरुद्ध कारवाईची मागणी टिकाराम बांते यांनी केली आहे.
लाखनी तालुक्यातील लाखोरी येथील टिकाराम बांते यांनी मुलगा प्रसाद बांते यांच्या नोकरीसाठी ८ आॅक्टोबर २०११ रोजी नूतन महाराष्ट्र विद्यालयाचे सचिव रविंद्र भालेराव यांना भेटले. त्यावेळी माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरी लावून देतो, फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला नोकरीचे आदेश मिळेल, असे आश्वासन देऊन ५ लाख रूपये मागितले.
मुलगा शिक्षक बनेल या उद्देशाने बांते यांनी नातेवाईकांकडून उसणवारी करून ५ लाख रूपयाची जुळवाजुळव केली. मुरलीधर कंगाले रा.उसरागोंदी यांच्या मध्यस्थीने १५ आॅक्टोबर २०११ ला ही रक्कम भालेराव यांना दिली. त्यावेळी मनोहर ठवकर, प्रसाद बांते व दोनोडे उपस्थित होते, असे टिकाराम बांते यांनी तक्र ारीत नमूद केले आहे. परंतु, फेब्रुवारी महिना लोटूनही नोकरीचे आदेश मिळाले नाही. त्यामुळे टिकाराम बांते यांनी भालेराव यांना विनंती केली.
शेवटी २ मार्च २०१५ ला स्वत:च्या स्वाक्षरीचे अडीच लाख रूपयांचा धनादेश बांते यांचे नातेवाईक अरविंद हलमारे यांच्याकडे आणून दिला. यावेळी भालेराव यांच्यासोबत शाळेचा शिपाई जयदेव कांबळे सोबत होता. उर्वरीत रक्कम एक महिन्यात देण्याची कबुलीही दिली होती.
लाखनी स्टेट बँकेचा अडीच लाख रूपयाचा धनादेश दिला. परंतु खात्यात पैसे नसल्यामुळे बँकेतून धनादेश परत आला. त्यानंतर पैसे मिळण्यासाठी त्यांनी भालेराव यांना मागणी केली. परंतु कारणे समोर करीत टाळाटाळ करीत आहेत.
७ जून २०१५ रोजी रविंद्र भालेराव यांच्या घरी जाऊन पैशाची मागणी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन शिवीगाळ केल्याचे बांते यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी टिकाराम बांते यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांना निवेदन दिले. परंतु, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.
यासंदर्भात भालेराव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. (नगर प्रतिनिधी)