नोकरीच्या नावाखाली तरुणांना लाखोंचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST2021-06-09T04:43:20+5:302021-06-09T04:43:20+5:30
भंडारा : केंद्र व राज्य शासनामार्फत रिक्त जागा भरण्यासंदर्भात सूचना जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत अनेक तरुणांनी ऑनलाइन अर्जही ...

नोकरीच्या नावाखाली तरुणांना लाखोंचा गंडा
भंडारा : केंद्र व राज्य शासनामार्फत रिक्त जागा भरण्यासंदर्भात सूचना जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत अनेक तरुणांनी ऑनलाइन अर्जही दाखल केले आहेत. मात्र नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेक तरुणांना लक्षावधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार आता समोर येत आहे. उल्लेखनीय म्हणजे आता फसवणूक झाली असतानाही अनेक तरुण व तरुणी भीतीपोटी पोलीस प्रशासनाकडे तक्रार देण्यास घाबरत आहेत.
विद्यमान परिस्थितीत पोस्ट ऑफिस कार्यालय तथा रेल्वे खात्यात या बऱ्याच जागा भरण्यासंदर्भात शासनाने जाहिरात प्रकाशित केली होती. तसेच अन्य विभागातील विविध पदे रिक्त असल्याची माहितीही दलालांमार्फत दिली जात असते. त्याअनुषंगाने अनेक बेरोजगार तरुण-तरुणींनी यासंदर्भात आवेदन (अर्ज) सादर केले आहेत. मात्र ही जागा भरण्यासंदर्भात अनेक दलालही सक्रिय झाले आहेत. भंडारा शहरासह तालुका मुख्यालयात अशा अनेक दलालांनी आपले साम्राज्य पसरविले आहे. भंडारा शहरासह लाखनी, साकोली, पवनी व लाखांदूर तालुक्यात हे दलाल सक्रिय आहेत. उल्लेखनीय म्हणजे यात एक महिलाही मास्टरमाईंडचे काम करीत आहे. नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुण-तरुणींकडून ५० हजार ते पंधरा लाखांपर्यंत रक्कम उकळल्याची विश्वसनीय माहिती आहे. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिस व रेल्वे खात्यात उच्चपदस्थ अधिकारी आमच्या इशाऱ्यावर काम करतात, असे प्रत्यक्ष सांगून या तरुणांना मोहित केले जाते. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्यामार्फत लक्षावधी रुपये गोळा करण्यात आले आहेत. आता त्यांची फसवणूक झाल्याची बाब लक्षात येत आहे, त्यामुळे सदर तरुण-तरुणी पैसे परत हवेत यासाठी संबंधित दलालांकडे तगादा लावीत आहेत.
बॉक्स
फोन करून मागविली जातात कागदपत्रे
‘तुम्ही फक्त कागदपत्रे द्या, बाकीचं आम्ही बघून घेतो’, असे दलाल सर्रासपणे बेरोजगार तरुण किंवा तरुणींना सांगतात. त्यांच्या आमिषाला बळी पडून सदर बेरोजगार कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती दलालांकडे देतात. मात्र १५ ते २० दिवस लोटल्यावर व पैसे दिल्यावरही नोकरी देण्यासंदर्भात काहीच हालचाल होत नसल्याने, हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात येत आहे. कागदपत्रे मागताना, तुम्हाला शंभर टक्के नोकरी मिळेल, असे सांगितले जाते. त्याच विश्वासावर बेरोजगार तरुण-तरुणी कागदपत्रे देत असतात. आता तर पैसे परत न करता टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत. गतवर्षी अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या १८ तक्रारी जिल्हा पोलीस प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. त्यापैकी १६ तक्रारींचा छडा लावण्यात पोलीस विभागाला यश आले होते.
बॉक्स
सर्वाधिक प्रकार ग्रामीण भागात
जिल्ह्यात पदवीधर शिक्षित बेरोजगारांची मोठी फौज आहे. कुठेही जागा निघाल्यास तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर करतात. हीच बाब हेरून अनेक दलाल सक्रिय होत असतात. ग्रामीण भागात याचा सर्वाधिक फायदा उचलला जातो. साध्या-सरळ नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्यामार्फत हा संदेश व्हॉट्स अप किंवा भ्रमणध्वनीवरून एकमेकांना सांगितला जातो. त्याचआधारे तरुणांना संबंधित घराचा किंवा एखाद्या भाड्याने घेतलेल्या कार्यालयाचा पत्ता देऊन तिथे यायला सांगितले जाते. तिथे पैशाचीही देवाण-घेवाण होते. पत्ता माहीत नसेल तर चक्क चारचाकी वाहनाने उमेदवारांना तिथे नेले जाते. तसेच नोकरी मिळेलच, अशी हमखास ग्वाही देण्यात येते. आता आपल्यालाही नोकरी मिळणार, या आशेपोटी अनेक बेरोजगारांनी लक्षावधी रुपये अशा दलालांना दिले आहेत.