मान्यता रद्द केल्यानंतरही झाली लाखोंची कामे
By Admin | Updated: July 21, 2014 23:42 IST2014-07-21T23:42:59+5:302014-07-21T23:42:59+5:30
पालोरा येथे महाराष्ट्र ग्रामीण रोहयो अंतर्गत १५ लक्ष रुपयांचे सिमेंट रस्त्याच्या कामांना मोहाडी खंड विकास अधिकाऱ्यांनी तांत्रीक व प्रशासकीय मान्यता अनुक्रमे ४ व ६ जानेवारी ला दिली.

मान्यता रद्द केल्यानंतरही झाली लाखोंची कामे
अधिकारी गप्प : प्रकरण मोहाडी तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांचे
करडी (पालोरा) : पालोरा येथे महाराष्ट्र ग्रामीण रोहयो अंतर्गत १५ लक्ष रुपयांचे सिमेंट रस्त्याच्या कामांना मोहाडी खंड विकास अधिकाऱ्यांनी तांत्रीक व प्रशासकीय मान्यता अनुक्रमे ४ व ६ जानेवारी ला दिली. त्यानंतर ६०:४० च्या प्रमाणात कुशल अथवा सिमेंट कामे बसत नसल्याचे कारण देत २० जानेवारीला प्रशासकीय मान्यता रद्द करून तसे पत्र पालोरा ग्रामपंचायतीला दिले. मात्र त्या पत्राला न जुमानता ग्रामपंचायतीने जुलै महिन्यात कामांना सुरुवात केली असताना अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली.
२०१४ या आर्थिक वर्षात मग्रारोहयोची पाहिजे त्या प्रमाणात कामे झाली नाही. तालुकास्तरावरील अहवालानुसार फक्त ४ लाख ४ हजारांची कामे झालीत. त्यामुळे गावात इतर कामे घेण्यासाठी निधी शिल्लक नव्हता. सदर वर्षात गावात कामे घेण्यासाठी अकुशल व कुशल कामांचे प्रमाण ६०:४० च्या रेशोमध्ये असणे गरजेचे होते. मात्र गाव प्रमाणात बसत नसतानाही खंड विकास अधिकाऱ्यांनी ९ लाख व ६ लाख रुपयाच्या दोन सिमेंट रस्त्याच्या कामांच्या अंदाजपत्रकांना तांत्रीक व प्रशासकीय मान्यता जानेवारीत प्रदान केली. विशिष्ट राजकीय मंडळींना खुश करण्यासाठी दबावात त्यासाठी खेळी खेळली गेल्याची चर्चा आता तालुक्यात रंगत आहे.
प्रकरण अंगावर येण्याची शक्यता दिसताच खंडविकास अधिकाऱ्यांनी पालोरा ग्रामपंचायतीला २० फेब्रुवारी रोजी कामे ६०:४० च्या प्रमाणात बसत नसल्याचे पत्र दिले. दिलेली प्रशासकीय मान्यता स्थगित करून पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात येत असल्याचे त्या पत्रात नमूद केले. तांत्रिक अभियंत्यासह अंदाजपत्रकाची तपासणी करून प्रमाणाबाबत अहवाल द्यावा, प्रशासकीय मान्यता घेऊन कामे करावी, अन्यथा त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी अशी स्पष्ट सूचना देण्यासही ते विसरले नहीत.मात्र ग्रामपंचायतीने त्या पत्राला वाटाण् याच्या अक्षता लावीत पुन्हा प्रशासकीय मान्यता न घेता किंवा ६०:४० च्या प्रमाणपत्राचा अहवाल न देता दणक्यात १५ लाखाच्या दोन्ही कामांना सुरुवात केली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरु झालेले सिमेंट रस्त्याचे एक काम पूर्ण झाले तर दुसरे अपूर्ण असतानाच कामे ग्रामपंचयातीने बंद केलीत. त्यामुळे गावात जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
इतर गावातील कामांनाही प्रशासकीय मान्यता?
मोहाडी खंडविकास अधिकाऱ्यांनी ६०:४० च्या प्रमाणात न बसणाऱ्या पालोरा गावातील सिमेंट रस्त्यालाच तांत्रीक व प्रशासकीय मान्यता दिली नाही तर तालुक्यातील इतर खास गावांनाही मान्यता प्रदान केल्याचीही बाब राजकीय गोटात चर्चेत आहे. मान्यता देण्यात आलेल्या गावांमध्ये पालोरा, दवडीपार, जांभळापाणी, रोहणा, सालेबर्डी, अकोला, पांढराबोडी गावातील १२ सिमेंट रस्ते व नाली कामांचा समावेश असून जवळपास ९५ लक्ष रुपयांच्या कामांना मंजुरी प्रदान केली असल्याचे बोलले जाते. राजकीय वर्तूळात चर्चील्या जात असलेल्या बाबींसंबंधी पंचायत विस्तार अधिकारी कुंभरे यांना विचारणा केली असता ते म्हणाले त्या गावांमध्ये अद्याप कामांना सुरुवात झालेली नसल्यामुळे प्रश्नच उपस्थित होत नाही. पालोरा वगळता उर्वरीत गावात कामे झाली नाहीत. एवढेच उत्तर त्यांनी दिले. (वार्ताहर)