चिखला गाव गडप होण्याची भीती!
By Admin | Updated: August 7, 2015 00:48 IST2015-08-07T00:48:30+5:302015-08-07T00:48:30+5:30
भूमिगत मॅग्नीज खाणीतील वेस्टेज मटेरियल साठवणूक स्थळांचे (डम्पींग) टेकडी तयार झाली.

चिखला गाव गडप होण्याची भीती!
तुमसर : भूमिगत मॅग्नीज खाणीतील वेस्टेज मटेरियल साठवणूक स्थळांचे (डम्पींग) टेकडी तयार झाली. मागील ६० वर्षांचे हे डम्पींग आहे. पावसाचे पाणी मुरत असल्याने टेकडी वाहून माईलच्या सदनिका व गाव गडप होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारीतील या खाणीकडे राज्य शासनाचे येथे सतत दुर्लक्ष होत आहे.
चिखला येथे भारत सरकारची ब्रिटीशकालीन भूमीगत मॅग्नीज खाण आहे. मागील ६० वर्षांपासून या खाणीतून लाखो टन उच्च दर्जाची मॅग्नीज उत्खनन करून खाणीजवळच खाणीतील वेस्टेज मटेरियल टाकण्यात आले. ते आजपर्यंत टाकणे सुरुच आहे. यामुळे खाणी सभोवताल मानवनिर्मित टेकड्या तयार झाल्या. चिखला खाणीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर मॉईल कामगारांच्या सदनिका आहेत. पुढे गाव आहे. सदनिकांच्या अगदी मागे डम्पींग मटेरियलची महाकाय टेकडी आहे. ही टेकडी खूप जुनी आहे. या टेकडीवर लहान मोठी झाडे उगवली आहेत. पावसाळ्यात संततधार पाऊस पडत असल्याने या टेकडीची माती, खडक, लहान दगड सैल होऊन जागा सोडण्याची शक्यता आहे. पावसाच्या पाण्यामुळे दगडांची झिज होते. झिज झाल्याने दगड सैल होतात व नंतर दगड घसरतात. याचा अनुभव कोकणात माळीण व नुकत्याच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर (महामार्ग) आला आहे. नैसर्गिक टेकड्या धोकादायक ठरल्या तर मानवनिर्मित टेकड्या धोकादायक ठरण्याची येथे निश्चित शक्यता आहे. ब्रिटीशांनी खाणीजवळ वेस्टेज मटेरियल टाकण्याची सुरुवात केली होती. त्याचाच कित्ता पुढे भारतीयांनी गिरविणे सुरु ठेवले. ब्रिटीशांच्या काळात मॅग्नीज उत्खननाचा वेग कमी होता. सध्या तांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन करणे सुरु आहे. कामगार व गावाच्या सुरक्षेच्या निश्चितच उपाययोजना येथे करण्याची झाली नाही. दरवर्षी केंद्र शासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक चौकशी व तपासणीकरिता येतात. त्यांचेही येथे दुर्लक्ष दिसत आहे.
चिखला गावात मोठी टेकडी आहे. टेकडीवरून लहान मोठे दगड खाली येण्याची येथे भिती आहे. (तालुका प्रतिनिधी)
पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था केली असून मटेरियल पिचिंग करण्यात आल्याने धोक्याची शक्यता नाही. २४ तास येथे पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील ६० वर्षात एकदाही दुर्घटनेचा प्रसंग आला नाही. वेळोवेळी येथे तपासणी व निरीक्षण करण्यात येते.
- व्ही.आर. परिदा
खाण व्यवस्थापक,
चिखला माईन