लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हवामान खात्याने मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे रेड अलर्ट जाहीर केला असला तरी, शुक्रवारी हा अंदाज चुकला. सकाळपासून पावसाची रिपरिप जिल्ह्यात होती. मात्र, दुपारनंतर पाऊस थांबला.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३५.३ मिमी पावसाची नोंद झाली. शुक्रवारी दुपारपर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. आकाश दिवसभर दाट ढगांनी आच्छादलेले होते. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पाऊस पडला. या दरम्यान, साकोली आणि सानगडी मंडळात मुसळधार पावसाची नोंद झाली. दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ६६.८ मिमी पाऊस पडला. या कालावधीत सर्वाधिक ६३.२ मिमी पाऊस साकोली तहसीलमध्ये नोंदला गेला. लाखनी तहसीलमध्ये ४७ मिमी, लाखांदूरमध्ये ४०.९, पवनीमध्ये ३२.७, मोहाडीमध्ये ३१.३, तुमसरमध्ये २८.२ आणि भंडारा तहसीलमध्ये २३.१ मिमी पावसाची नोंद झाली. सरासरी ३५.३ मिमी होती.
वैनगंगेच्या पातळीत ८ तासांत अर्धा मीटरने वाढवैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढत आहे. मध्य प्रदेशातील संजय सरोवराच्या एका गेटव्यतिरिक्त, गोंदियातील पुजारीटोलाचे ६ आणि धापेवाडा बॅरेजचे १४ गेट उघडण्यात आले आहेत, ४,०४०.१३ क्युमेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे वैनगंगेची पाणी पातळी वाढली आहे. २५ जुलै, शुक्रवारी सकाळी ८:३० वाजताच्या तुलनेत ८ तासांत सायंकाळी ४:३० वाजता नदीची पाणी पातळी अर्ध्या मीटरने वाढली असली तरी ती धोक्याच्या चिन्हाखाली आहे.
गोसेखुर्दचे सर्व ३३ गेट सुरू
- भंडारा : खोऱ्यांमध्ये सतत पाऊस पडत असल्याने आणि सीमावर्ती जल प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वैनगंगा नदीची आणि पवनीजवळील गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. संभाव्य पुरावर नियंत्रण मिळविण्यासाठी, सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
- यातील तीन गेट एक मीटरने तर, ३० गेट अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. यातून ३,९६६ क्युमेक (१ लाख ४०,०५८ क्युसेक) पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे धरणाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने किनारी भागातील नागिरकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.