मेमो लोकल रेल्वे दीड वर्षापासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 05:00 IST2021-08-05T05:00:00+5:302021-08-05T05:00:12+5:30
कोरोना संसर्गामुळे रेल्वे प्रवासी सुविधा बंद करण्यात आली होती. आता कोनोना संसर्ग कमी झाल्याने अलीकडे एक्स्प्रेससह प्रवासी गाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र दीड वर्ष उलटूनही मेमो लोकल सुरू करण्यात आली नाही. गोंदिया-इतवारी मेमो लोकल सकाळी ७.३० वाजता वरठी रोड स्थानकावरून इतवारीकडे प्रस्थान करते. इतवारी रेल्वे स्थानकावर सकाळी ९ वाजता दरम्यान पोहोचते.

मेमो लोकल रेल्वे दीड वर्षापासून बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाने दीड वर्षापासून बंद असलेल्या इतवारी - गोंदिया मेमो लाेकलमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. मोहाडी व भंडारा तालुक्यातील शेकडो मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी वरठी स्थानकावरून नागपूर येथे जायचे. मात्र आता लोकल रेल्वेच बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोना संसर्गामुळे रेल्वे प्रवासी सुविधा बंद करण्यात आली होती. आता कोनोना संसर्ग कमी झाल्याने अलीकडे एक्स्प्रेससह प्रवासी गाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र दीड वर्ष उलटूनही मेमो लोकल सुरू करण्यात आली नाही. गोंदिया-इतवारी मेमो लोकल सकाळी ७.३० वाजता वरठी रोड स्थानकावरून इतवारीकडे प्रस्थान करते.
इतवारी रेल्वे स्थानकावर सकाळी ९ वाजता दरम्यान पोहोचते. या रेल्वेने शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसह मजूर, छोटे व्यावसायिक, दूध विक्रेते नागपूर येथे जातात. बांधकामावर जाणाऱ्या मजुरांची संख्या मोठी असते. त्यामुळे मेमो रेल्वे या भागातील नागरिकांसाठी जीवनदायी आहे.
भंडारा रोड अर्थात वरठी रेल्वे स्थानक या प्रवासासाठी सोयीचे आहे. वरठी परिसरातील २५ - ३० गावांतील आणि भंडारा शहरासह मोहाडी तालुक्यातील प्रवासी येथूनच प्रवास करतात.
तसेच नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील गावांतील प्रवासीही याच रेल्वेला पसंती देतात. परंतु आता ही रेल्वे दीड वर्षापासून बंद असल्याने अनेकांचा रोजगार बुडाला आहे. अल्प मजुरीत एसटी बसने प्रवास करणे शक्य नाही. दुसरीकडे गावात हाताला काम नाही. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही जण दुचाकीने जातात; मात्र पेट्रोलच्या दरवाढीपासून तेही बंद झाले.
दिवसभर राबून दिडशे रुपयेही उरत नाहीत
- नागपूरला जाण्यासाठी सकाळी आणि परत येण्यासाठी इतवारी-डोंगरगड मेमो लोकल असल्याने कमी पैशांत जाणे-येणे होत होते. मात्र आता दुचाकी किंवा एसटी बसने जायचे म्हटले तर मोठा खर्च येतो. वेळही अधिक लागतो. दिवसभर राबल्यानंतर प्रवासावर पैसा खर्च झाला तर हाती दीडशे रुपयेही उरत नाहीत. त्यामुळे अनेकांनी आता नागपूरला कामासाठी जाणेच बंद केले. आता कोरोनाचा प्रदुर्भाव काहीसा कमी झाला असून, मेमो लोकलसह इतरही गाड्या सुरू करण्याची मागणी होत आहे.