सर्वाधिक दराने पीककर्ज वाटप
By Admin | Updated: January 26, 2016 00:30 IST2016-01-26T00:30:16+5:302016-01-26T00:30:16+5:30
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक सभासद शेतकऱ्यांसाठी, जिल्हा सहकारी बँकेने एकरी १६ हजार ५०० रूपये याप्रमाणे धान कर्ज देण्यात येणार असून...

सर्वाधिक दराने पीककर्ज वाटप
जिल्हा सहकारी बँकेचा पुढाकार : सुनील फुंडे यांचा शेतकरी हिताचा निर्णय
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक सभासद शेतकऱ्यांसाठी, जिल्हा सहकारी बँकेने एकरी १६ हजार ५०० रूपये याप्रमाणे धान कर्ज देण्यात येणार असून ३१ मार्चपर्यंत एक लाख रूपयांपर्यंतचे कर्जाची परतफेड करणाऱ्यांना शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित कृषी तज्ज्ञ समितीच्या सभेत घेण्यात आला.
या बैठकीत सन २०१६-१७ च्या खरीप व रबी आणि बागायती पिक कर्ज वाटपाचे दर धोरण ठरविण्यात आले. भंडारा जिल्ह्यात उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने येत्या हंगामात ऊस लागवडीसाठी एकरी ३३ हजार, केळी लागवडीसाठी एकरी ४२ हजार, कांदा लागवडीसाठी हेक्टरी ५५ हजार रूपये, हळद लागवडीसाठी हेक्टरी ८० हजार मिरची व बटाटे लागवडीसाठी हेक्टरी ५७ हजार ५०० रूपये देण्यात येत आहे. या व्यतीरिक्त शेवंती, झेंडू व मोगरा या फुल शेती लागवडीसाठी हेक्टरी ३० हजार रूपये, गुलाब फुल शेतीसाठी हेक्टरी ४० हजार याप्रमाणे कर्जपुरवठा करण्यात येणार असून याचा शेतकरी सभासदांनी लाभ घ्यवा, असे आवाहन फुंडे यांनी केले आहे. ही कर्जमर्यादा बिनव्याजी वापरण्यासाठी ३१ मार्चपूर्वी त्यांचे कडील थकीत, चालू कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित सभासदांनी त्यांचेकडील थकीत, चालू कर्जाची परतफेड ३१ मार्चपूर्वी करण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी सभासदांनी बँकेच्या शाखेत जावून कर्ज वसुली जमा करावी. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या खातेदारांनी के.वाय.सी. ची पुर्तता केली नसेल त्यांनी बँकेच्या संबंधित शाखेत जावून के.वाय.सी. ची पुर्तता करावी. १ एप्रिलपासून भंडारा जिल्हा सहकारी बँक, रुपे किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून कोअर बँकींग प्रणालीद्वारे दर्जेदार व तातडीने सेवा उपलब्ध करून देत आहे. याचा लाभ सर्वसामान्यांना होणार आहे.
या सभेला प्रगतीशील शेतकरी यादवराव कापगते, रेवाराम निखाडे, जिल्हा बँकेचे संचालक रामलाल चौधरी, सत्यवान हुकरे, विलास वाघाये, अशोक मोहरकर, रामदयाल पारधी, होमराज कापगते, नाबार्ड जिल्हा विकास व्यवस्थापक अरविंद खापर्डे, जिल्हा उपनिबंधक, सह. संस्था, संजय क्षीरसागर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भोयर, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक संजय पाठक, जिल्हा मध्य. सह. बँकेचे सरव्यवस्थापक किशोर बोबडे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)