जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणासाठी माविमचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:33 IST2021-03-08T04:33:02+5:302021-03-08T04:33:02+5:30

भंडारा : जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना रोजगाराच्या विविध संधी मिळाव्यात यासाठी माविमने पुढाकार ...

MAVIM's initiative for women empowerment in the district | जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणासाठी माविमचा पुढाकार

जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणासाठी माविमचा पुढाकार

भंडारा : जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना रोजगाराच्या विविध संधी मिळाव्यात यासाठी माविमने पुढाकार घेतला आहे. स्वतःच्या छोटा व्यवसाय, उद्योग उभारणीतून स्वतःची ओळख निर्माण व्हावी यासाठी जिल्ह्यातील २९९ गावांत २३५२ बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्यातील तीस हजार १४८ महिलांच्या पंखात बळ भरण्याचे काम केले आहे. यासाठी तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस योजनेअंतर्गत जिल्ह्यात एक कोटी ५८ लाख ४५ हजारांचे कर्ज महिलांना वितरित केले आहे. यातून अनेक महिलांनी रिक्षा, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, चप्पल दुकान, चहाचा स्टॉल, मिरची कांडप यंत्र, झेरॉक्स व्यवसाय, बारदान निर्मिती अशा विविध उद्योगांची उभारणीतून आहे. आज या उद्योगांमुळे विविध महिला बचत गट आर्थिक सक्षम झाले असून, अनेक महिला स्वतःच्या कुटुंबासह स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. त्यामुळे आज जागतिक महिला दिनानिमित्ताने खऱ्या अर्थाने या सावित्रीच्या लेकींनी समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्याबाबत त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

कोट १

परिश्रम जिद्द बाळगल्यास कोणतीही गोष्ट शक्य

महिला बचत गट हा माविमचा आत्मा आहे. गरीब गरजू महिलांना बचत गटात समाविष्ट करून त्यांच्या सुप्त गुणांना व विविध कौशल्यांना वाव देण्यासाठी माविमने नेहमीच पुढाकार घेतला आहे. अगदी शंभर रुपयांच्या रोजगारासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांना लोकसंचालित साधन केंद्राशी जोडून शासनाच्या विविध योजनेचा लाभ देत, तसेच उद्योग उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले. महिलांना बँकेत जाऊन कर्ज मिळायचे नाही; मात्र आज विविध उद्योग उभारणीमुळे अनेक बँका आज महिलांच्या दारापर्यंत पोहोचत आहेत. हे माविमच्या महिला सक्षमीकरणाचे फलित आहे.

प्रदीप काठोळे,

जिल्हा समन्वयक,

महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडारा.

कोट २

पती निधनानंतरही कुटुंबाला सावरणाऱ्या अल्काताई

साकोली तालुक्यातील जांभळी सडक येथील साची महिला बचत गटाची मी सदस्य आहे. मी बँक ऑफ इंडियाचे कर्ज घेतले होते. मात्र, घरची आर्थिक परिस्थिती व इतर कारणांमुळे मला वेळेवर कर्ज भरता आले नाही. त्यातच कोरोनाची परिस्थिती आणि त्यानंतर पतीच्या निधनानंतर मी पूर्ण खचून गेले होते. मात्र, अशावेळी माविमच्या तेजश्री फायनान्शियल योजनेअंतर्गत मला २० हजार रुपयांची आर्थिक मदत झाली आणि उर्वरित पंचवीस हजार रुपयांसाठी बँकेची किश्त सुरू केली. त्यातून चहा स्टॉलच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून बँकेची नियमित हप्ते भरत आहे. पतीचे निधन झाल्यानंतर माझ्यावर आभाळच कोसळले होते. मात्र, अशा कठीण संकटकालीन प्रसंगात लोकसंचलित साधन केंद्राने मोठा आधार दिल्यानेच मी या परिस्थितीतून बाहेर पडत तेजश्री योजनेचा लाभ मिळाल्यानेच माझा आत्मविश्वास वाढला आहे.

अल्का वालकर, साची महिला बचत गट, जांभळी सडक, साकोली.

कोट ३

बारदाना निर्मितीतून रोजगार देणाऱ्या रेखाताई

तुमसर तालुक्यातील खरबी येथील महालक्ष्मी महिला बचत गटाची मी सदस्य आहे. बचत गटात सदस्य होण्यापूर्वी मी शेतात मजुरी करायची. मात्र, त्यानंतर माविमच्या एका प्रशिक्षणात सहभागी झाले आणि तिथूनच बचत गटाशी जोडले गेले. त्यातूनच आम्हाला बारदाना उद्योग सुरू करण्याचे मार्गदर्शन मिळाले. अवघ्या २० हजार रुपयांच्या कर्जातून उभारलेला हा उद्योग आज ३६,००० बारदाना आम्ही तयार करतो आहोत. महिन्याकाठी आम्हाला ६० हजारांचे उत्पन्न मिळत आहे. यासाठी दोन स्वतंत्र मशीन व घरपोच डिलिव्हरीसाठी मालवाहू गाडी घेतली आहे. दुसऱ्याकडे मजुरी करणारी मी महिला या व्यवसायातून इतरांनाही रोजगार देत आहे. ते केवळ माविममुळेच करू शकलो.

रेखा सिंधपुरे,

महालक्ष्मी महिला बचत गट खरबी, तुमसर.

कोट ४

अगरबत्ती व्यवसायातील आदर्श यशोदाकाकू

तुमसर तालुक्यातील बोरी या छोट्या खेडेगावातील मी एक महिला. घरी शेती हाच व्यवसाय. त्यामुळे दुसऱ्याकडे शेतमजुरी करायची. त्यानंतर महिला बचत गटाचे सदस्य झाले. हळूहळू मीटिंग व्हायच्या. त्यातून अगरबत्ती तयार करण्याचे शिकलो आणि आता तुमसर मोहाडीला जाऊन मी स्वतः अगरबत्तीची विक्री करते यातून महिन्याकाठी बारा हजार रुपये मिळतात. त्यामुळे सर्व काही आज चांगले आहे.

यशोदा बोरकर,

वैष्णवी महिला बचत गट, सदस्य बोरी, तुमसर.

कोट ५

गावकऱ्यांची पायपीट थांबविणाऱ्या योगिताताई

लाखांदूर तालुक्यातील चप्राड माझे गाव. गावात शेतीव्यतिरिक्त दुसरा कामधंदा नाही. त्यामुळे हंगामी रोजगार मिळायचा. मात्र, रोजगारासाठी काहीतरी करावे असे वाटायचे. माझे घर ग्रामपंचायतीसमोर असल्याने माहेश्वरी लोकसंचलित साधन केंद्राच्या सहयोगीनी ताईंनी झेरॉक्स व्यवसाय सुरू करण्यास सांगितले. त्यातूनच मी झेरॉक्स व्यवसाय सुरू केला. त्यामुळे मला रोजगार तर मिळालाच, पण एका झेरॉक्स कागदासाठी बाहेरगावी होणारी गावकऱ्यांची पायपीटही थांबली. आज मला माझ्या कुटुंबीयांचीही यासाठी मदत मिळत आहे. गावात घरी राहून दहा हजार रुपये महिना मी कमवते आहे हे केवळ बचत गटामुळेच शक्य झाले.

योगिता देशमुख, जिजामाता महिला बचत गट, उपाध्यक्ष चप्राड, लाखांदूर.

कोट ६

शिवण क्लासचे धडे देणाऱ्या सरिताताई

मला शिवण कामाची आवड होती. त्यामुळे कपडे शिवणकामाचे प्रशिक्षण घेतले. त्यातून बचत गटाचे दहा हजार कर्जातून मशीन घेतली. मुलींना शिवण क्लास शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर झेप साधना केंद्राच्या माध्यमातून गावातील मेन चौकात दुकान थाटले. त्यामुळे व्यवसायात भरमसाट वाढ झाली आहे. एवढ्यावरच थांबले नाही तर माविमने कांडप यंत्र, मळणी यंत्र दिल्याने व्यवसाय आणखी वाढवला. मात्र, हे सर्व करताना पैशाची बचत कशी करायची हे माविमच्या लोकसंचलित साधन केंद्र झेप मधूनच शिकलो.

सरिता उपरीकर,

सायली महिला बचत गट वाकल, लाखनी.

कोट ७

झेप लोकसंचलित साधन केंद्राच्या सह्योगिनी ताई मरेगावात सारख्या यायच्या. तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळेल, तुम्ही बचत गट सुरू करा. आम्ही सर्वतोपरी मदत करू सांगायच्या. मात्र, मनात कर्जबाजारी होऊ अशी भीती वाटायची. मात्र, त्यांनीच आमची हिंमत वाढवून एक गाय घेतली. ते कर्ज फेडले. त्यानंतर आणखी कर्ज घेत चहाचे दुकान सुरू केले. घरीच दूध असल्याने चांगले पैसे मिळू लागले. त्यानंतर चहासोबत किराणा दुकान सुरू केले. यातूनच माझ्या मुलांचे शिक्षण केले.

प्रमिला ब्राह्मणकर,

ओम शांती महिला बचत गट मरेगाव, लाखणी.

कोट ८

साडी विक्री व ज्वेलरी व्यवसायातील आत्मनिर्भर नूतनताई

मोहाडी तालुक्यातील एका छोट्या खेड्यात २०१०ला शिवणकाम करीत होते. त्यानंतर बचत गटामार्फत माविमशी जोडले गेले. आणि त्यातूनच माझा आत्मविश्वास वाढत गेला. शिवणकामासोबतच मला विक्री कौशल्य, प्रशिक्षण मिळाल्यानेच घरीच स्वतः चा साडी विक्री, ड्रेस मटेरियल, ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आज बँकेच्या कर्जाची परतफेड करून स्वतःची दुचाकी घेतली आहे. महिन्याला पंधरा हजार रुपये मिळतात यात माझा नफा १० हजारांचा आहे. त्यामुळे भविष्यात महिला बचत गटामार्फत तालुका, जिल्हा स्तरावर उद्योग वाढविण्याचा मानस आहे.

नूतन सार्वे, गौरी महिला बचत गट एकलारी, मोहाडी.

कोट ९

ई रिक्षा चालविणाऱ्या रुकसाना

गावातील महिलांकडून बचत गटाविषयी माहिती होतीच. मात्र, प्रत्यक्ष सिरसोली येथे महिला बचत गटाची सदस्य झाले. आणि तिथूनच मनातील भीती कमी होत गेली. यासोबतच मानव विकास अंतर्गत मला ई रिक्षाचा लाभ मिळाला. आता या ई रिक्षा व्यवसायातूनच पाचशे रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. बचत गटामुळेच मला चांगला आत्मविश्वास मिळाला. आम्हाला माविम विविध प्रशिक्षणे दिली त्याचा जगण्यासाठी प्रत्यक्षात फायदा होत आहे.

रुकसाना छवारे, सिरसोली.

Web Title: MAVIM's initiative for women empowerment in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.