नारळाआड गांज्याची तस्करी उघड; ६३२ किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 15:11 IST2021-11-30T15:06:14+5:302021-11-30T15:11:41+5:30
रविवारी आपल्या पथकासह रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांना एक वाहन संशयास्पद वाटल्याने त्यांनी पाठलाग करून वाहन पकडले असता त्यात तब्बल ६३२ किलो गांजा आढळून आला.

नारळाआड गांज्याची तस्करी उघड; ६३२ किलो गांजा जप्त
भंडारा : अचानक वेग वाढल्याने संशय आल्यावरून पाठलाग करून वाहन पकडले असता त्यात तब्बल ६३२ किलो गांजा आढळून आला. ही कारवाई जिल्हा वाहतूक शाखेने राष्ट्रीय महामार्गावर रविवारी केली असून नारळाआड गांज्याची तस्करी होत असल्याचे पुढे आले.
जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम रविवारी आपल्या पथकासह रात्र गस्तीवर होते. त्यावेळी पोलिसांना पाहताच पांढऱ्या रंगाचे पीकअप वाहन अचानक वेगाने गेले. हा प्रकार कदम यांना संशयास्पद वाटला. त्यांनी या वाहनाचा पाठलाग केला असता. मुजबी परिसरात वाहन थांबविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत वाहनातील चालक आणि त्याचे सहकारी पसार झाले. पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता त्यात नारळ आढळून आले. मात्र वाहन वेगाने का गेले याबाबत शंका असल्याने नारळ बाजूला करून बघितले असता त्यात तब्ब्ल १७ प्लॉस्टिकच्या बोऱ्या आढळून आल्या. त्यात ६३२ किलो गांजा असल्याचे दिसून आले.
या घटनेची माहिती तात्काळ भंडारा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी गांजा ताब्यात घेवून तो पोलीस ठाण्यात आणला. तसेच बोलेरो पीकअप वाहनही जप्त केले. या सोबतच ७३० नारळ, नॉयलॉन दोर ताब्यात घेतले आहे. गांज्याची किंमत ६३ लाख २३ हजार ८२० रुपये असून, जप्त केलेल्या वाहनाची किंमत पाच लाख रुपये आहे. वाहन ओडिशा राज्यातील असून ते भंडारा मार्गे नागपूरकडे जात होते. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अरविंद जगने यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिनेस्टॉइल पाठलाग
रविवारी रात्री वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांना एका वाहनाचा संशय आला. त्याला थांबण्याची सूचना केल्यावरही तो वेगाने पळून जात होता. त्यामुळे वाहतूक शाखेच्या वाहनाने पीकअप वाहनाचा पाठलाग सुरू झाला. सिनेस्टॉइल पाठलाग सुरू असताना मुजबीजवळ वाहन थांबविण्यात यश आले.