अनेकांचे हात सरसावले मदतीला
By Admin | Updated: August 14, 2014 23:34 IST2014-08-14T23:34:43+5:302014-08-14T23:34:43+5:30
अनियंत्रित झालेल्या तुमसर-मुंढरी बसला काल मोहगाव नाल्याजवळील वळणावर भिषण अपघात झाला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सुमारे ५३ प्रवाशांना घेऊन येणारी बस

अनेकांचे हात सरसावले मदतीला
मदतीमुळेच बचावले जीव : मोहगाव वळणावरील अपघात
करडी(पालोरा) : अनियंत्रित झालेल्या तुमसर-मुंढरी बसला काल मोहगाव नाल्याजवळील वळणावर भिषण अपघात झाला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सुमारे ५३ प्रवाशांना घेऊन येणारी बस बाजूच्या झाडाला धडकली. जोरदार धडकेने बसचा समोरीेल भग पूर्णत: क्षतीग्रस्त झाला. अपघात होताच प्रवासी जीवाच्या आंकाताने ओरडले. जो तो बचावासाठी ओरडत होता. शेतावरील नागरिक मदतीला धावले. रस्त्यावरील नागरिक थांबले. भयावह स्थिती पाहून घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी करडी पोलिसांना माहिती दिली.
अपघाताची घटना संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली. अनेकांंचे फोन वारंवार खणखणत होते. मोबाईलवरुन घटना सांगितली जात होती.
हजारो नागरिकांच्या गाड्या अपघातग्रस्त ठिकाणाच्या दिशेने धावू लागल्या. जो-तो घटनेची माहिती सांगत सुटला होता. बसचा दरवाजा दाबल्या गेल्याने उघडत नव्हता. जखमांनी शाळेचे विद्यार्थी व प्रवासी विव्हळत होते. अनेकांचे डोके फुटले, दात तुटले, हातपाय फ्रॅक्चर झाले. प्रवासी सिटांमध्ये फसले होते. बसमध्ये रक्ताचा सडाच पडला होता. रस्त्यावर बसच्या तुटलेल्या भागाचे अवशेष अस्तव्यस्त विखुरलेले होते. मदतीसाठी मोठी अडचण होती. नागरिकांनी हिकमतीने दरवाजा तोडला. प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. मात्र दाबल्या गेलेल्या भागातून प्रवाशांना काढणे जोखमीचे होते.
दोन तासापर्यंत नागरिकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. हजारो हातांनी बस ढकलण्याचे प्रयत्न असफल प्रयत्न होत होते. तीनदा ट्रकांना दोर बांधून बस ओढल्या गेली. दोर तुटले, परंतु गेरमध्ये फसलेली बस हलत नव्हती. वैनगंगा शुगर अँड पॉवर करखान्याचे अधिकारी व कामगार त्यासाठी प्रयत्न करीत होते. देव्हाडापासून मुंढरी, पालोरा, जांभोरा, करडी, निलज खुर्द, निलज बुज., कान्हळगाव, मोहगाव नागरिक मदतीसाठी झटत होते. करडीचे सहाय्यक फौजदार अश्विन मेहर, पोलीस हवालदार आसाराम नंदेश्वर, पोलीस नायक गौरीशंकर गौतम यांनी भंडारा, तुमसर येथून अॅम्बुलन्स बोलविल्या.
निलज रेतीघाटाचे कंत्राटदार पिंटू शर्मा, सामाजिक कार्यकर्ते निशिकांत इलमे यांच्या दोन जेसीबीने बस ओढल्या गेली. नाना ढेंगे यांनी स्वत:च्या वाहनाने गॅस कटर आणून सीट व बसचा समोरील भाग कापून फसलेले विद्यार्थी व प्रवाशांना काढण्यास मदत केली.
जांभोरा येथील जय संतोषी मा विद्यालयाचे संचालक सुरेश गहाणे, गौरीशंकर राऊत, उमेश तुमसरे, गणेश ठवकर, जि.प. सदस्य महेंद्र शेंडे, के.बी. चौरागडे, सियाराम साठवणे, श्रीकांत डोरले, उमेश इलमे यांनी स्वत:च्या खाजगी वाहनातून जखमींना करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचविण्यास मदत केली.
करडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. झोडे, डॉ.शेख व कर्मचाऱ्यांनी तत्परतेने वैद्यकीय सेवा पुरवून तसेच शासकीय अॅम्बुलन्स बोलावून २८ रुग्णांना भंडारा सामान्य रुग्णालयात रेफर केले. उर्वरित २२ जखमींवर उपचार करुन रात्री घरापर्यंत पोहचविण्यास सहकार्य केले. वृद्धांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी वेळेवर मदत दिल्याने अनेकांचे प्राण वाचले. (वार्ताहर)