गावात शांतता प्रस्थापित करा
By Admin | Updated: April 14, 2016 00:44 IST2016-04-14T00:44:41+5:302016-04-14T00:44:41+5:30
गाव माझा, मी गावाचा म्हणत प्रत्येकाने गावाविषयी सकारात्मकता दाखविली पाहिजे.

गावात शांतता प्रस्थापित करा
शांतता समितीची बैठक : शुभांगी मदनकर यांचे प्रतिपादन
पालांदूर : गाव माझा, मी गावाचा म्हणत प्रत्येकाने गावाविषयी सकारात्मकता दाखविली पाहिजे. जबाबदारीपूर्ण कर्तव्य करीत गाव सेवेत हातभार लावून गावात शांतता प्रस्तापित करण्यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्याची गरज असल्याचे प्रतिपादन सरपंच शुभांगी मदनकर यांनी केली.
ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या शांतता बैठकीच्या वेळी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर ठाणेदार सय्यद, जिल्हा परिषद सदस्य वर्षा रामटेके, तंटामुक्त समिती अध्यक्ष हेमराज कापसे, ग्रामविकास अधिकारी बावनकर, उपसरपंच पा.मा. खंडाईत कवलेवाडा आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना त्यांनी, पालांदूर गावात सर्व जातीधर्माचे लोक पारंपारिक पद्धतीने आपआपले व्यवसाय सांभाळून गाव विकासाकरिता एकीने पुढे येतात. गावात राहून गावाची कुठल्याही कारणाने नाहक बदनाम करणाऱ्यांपासून सर्वांनी दुर राहून गावाच्या विकासाचा ध्यास घ्यावा, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. जिल्हा परिषद सदस्य वर्षा रामटेके यांनी, महिलांनी संगठीतपणे पुढे येणे काळाची गरज आहे. दारुबंदी करणे अवघड नाही. परंतु महिलावर्गात एकता निर्माण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.
१४ एप्रिल ते १७ एप्रिल या चार दिवसात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती महोत्सव व बौद्ध धम्म मेळावा आयोजित केला आहे. याचवेळी १५ एप्रिलला रामनवमीचा कार्यक्रमसुद्धा आयोजिला आहे. गावकऱ्यांनी दोन्ही कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे रामटेके यांनी प्रतिपादन केली.
ठाणेदार सय्यद यांनी, पालांदूर अत्यंत शिस्तप्रिय गाव असून कायद्याची जाण असणारा सुजाणवर्ग आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महोत्सव व रामनवमीचा कार्यक्रम गुण्यागोविंदाने पार पडेल यात शंका नाही. मात्र काही विध्वंसक बुद्धीच्या नागरिकांपासून सावधानता बाळगूण राहिल्यास गावात शांतता प्रस्तापित होईल, असे प्रतिपादन केले. यावेळी व्यासपिठावरील मान्यवरांनी गावातील वातावरण शांत ठेवण्यासाठी व सर्व समाजाचे कार्यक्रमाला गालबोट न लागता शांततेत पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले. शांतता समितीच्या बैठकीला पालांदूर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील, शांतता समितीच्या सदस्या सिंधू किन्नाके, बिंदू कोचे आणि नवयुवक बौद्ध कमेटीचे अध्यक्ष मारोती शेंडे, उपाध्यक्ष हरिदास बडोले, भिकेंद्र शेंडे, अविनाश बडोले उपस्थित होते. कार्यक्रमाकरिता ग्रामपंचायत कर्मचारी व पोलीस विभागाने सहकार्य केले. (वार्ताहर)