उत्तम आरोग्यासाठी सेंद्रिय शेती करा
By Admin | Updated: October 20, 2015 00:42 IST2015-10-20T00:42:49+5:302015-10-20T00:42:49+5:30
खताचे, कीटकनाशकांचे व मजुरीचे वाढलेले दर व न परवडणारी शेती भविष्यात टिकविण्यासाठी शेतकरी बंधूंनो,..

उत्तम आरोग्यासाठी सेंद्रिय शेती करा
पालोरा येथे शेती कार्यशाळा : मेश्राम यांचे मार्गदर्शन
करडी (पालोरा) : खताचे, कीटकनाशकांचे व मजुरीचे वाढलेले दर व न परवडणारी शेती भविष्यात टिकविण्यासाठी शेतकरी बंधूंनो, कमी खर्चीची व उत्तम स्वास्थ देणारी सेंद्रीय शेतीकडे वळा. पशु-पक्षी व मानवी आरोग्य रासायनिक शेतीमुळे दूषित झाले आहे. आजच त्यावर उपाय योजना केली नाही तर पुढील काळात शेती निरूपयोगी ठरेल. त्यासाठी आज टप्याटप्याने सेंद्रिय शेतीकडे वळा, असे कळकळीचे प्रतिपादन तज्ज्ञ मार्गदर्शक व तुमसर तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी महेंद्र मेश्राम यांनी केले.
पालोरा येथील हनुमान मंदिरात मोहाडी तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित सेंद्रिय शेती अभियान कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मेश्राम बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सरपंच माला मेश्राम होत्या तर उद्घाटन मोहाडीचे उपसभापती विलास गोबाडे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्या सरिता चौरागडे, नीलिमा इलमे, पं.स. सदस्य महादेव बुरडे, तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, मंडळ अधिकारी आर.जी. गायकवाड, उपसरपंच गणेश कुकडे, युवराज गोमासे प्रामुख्याने उपस्थित होते.
सेंद्रिय शेती पद्धतीमुळे शेतीवरचा खर्च कमी होवून उत्पादकतेत कमतरता येत नाही. अधिक गुणवत्ता पूर्ण शेतमाल तयार होतो. शास्त्रोक्त पद्धतीने सेंद्रिय शेती केल्यास उत्पादकतेत वाढ झालेली दिसून येत आहे. त्यासाठी बीजप्रक्रिया तंत्र, जिवामृत तयार करण्याची व शेतीला देण्याची पद्धत, अमृतपाणी, संजीवके तयार करणे, दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत समजून घेण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन असल्याची महत्त्वपूर्ण माहिती, तालुका कृषी अधिकारी किशोर पाथ्रीकर यांनी दिली.
बी-बियाणे, गुरांचा चारा, जनावरे व मानवी शरीरात कीटकनाशकांचे विघातक परिणाम जाणवत आहे. वारंवारच्या वापरामुळे कीटकांची प्रतिकार क्षमता वाढलेली आहे. जमिनीचा पोत बिघडला आहे. भविष्यातील दुष्परिणाम टाळण्यासाठी सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय असल्याचे मार्गदर्शन आर.जी. गायकवाड यांनी प्रास्ताविकातून केले.
कार्यशाळेत बीजप्रक्रिया, जीवामृत, अमृतपाणी, संजीवके, दशपर्णी अर्क कसे तयार करायचे, याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. त्यांचे फायदे व वापर करण्याची पद्धतही उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आली. धानावरील व इतर पिकांवरील रोग व किटक कसे ओळखायचे, यासाठी स्लाईड शो दाखविण्यात आला. रोग, किडी आणि अळींचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी मशागतीपासून तर पिकांच्या वाढीबरोबर टप्प्याटप्प्याने करावयाच्या विविध प्रक्रिया व फवारणी त्याचबरोबर कृषी विभागाच्या विविध योजना आणि अनुदानावर मिळणारी यंत्र व इतर साहित्याची माहिती देण्यात आली. फळबागायती पिके व व्यापारी, मसाल्यांच्या पिकांची आजच्या काळातील उपयोगिता या विषयावर कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार व महेंद्र मेश्राम यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन निमचंद्र चांदेवार, प्रस्तावना आ.जी. गायकवाड यांनी तर आभार कृषी सहायक उदाराम निखाडे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी कृषी सहायक यादोराव बारापात्रे, प्रिती डुकरे, समुदाय संघटक एतिका येळणे, कृषितज्ज्ञ नरेंद्र जगनाडे, कृषी मित्र देवदास बडवाईक, सेंगराज रोकडे, करडीचे साठवणे यांनी सहकार्य केले. यावेळी करडी व बेटाळा जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. (वार्ताहर)