फुफ्फुसाचा होतोय कोळसा ! २०२० पर्यंत केवळ सिगारेटमुळे होतील १३ टक्के मृत्यू
By Admin | Updated: March 24, 2015 00:24 IST2015-03-24T00:24:09+5:302015-03-24T00:24:09+5:30
धूम्रपान करणे हे काही लोकांसाठी स्टेटस सिंबल आहे, तर काही लोकांसाठी फॅशन मात्र या नव्या संस्कृतीचे तोटे दिसायला सुरूवात झाली आहे.

फुफ्फुसाचा होतोय कोळसा ! २०२० पर्यंत केवळ सिगारेटमुळे होतील १३ टक्के मृत्यू
भंडारा : धूम्रपान करणे हे काही लोकांसाठी स्टेटस सिंबल आहे, तर काही लोकांसाठी फॅशन मात्र या नव्या संस्कृतीचे तोटे दिसायला सुरूवात झाली आहे. जगात सुमारे ७ टक्के लोक हे प्रतिबंधात्मक फुफ्फुसाच्या आजाराने दगावत असल्याचे समोर आले आहे. जगभरात फुफ्फुसाच्या आजाराने दगावणाऱ्या रुग्णांच्या संख्येत भारत चतुर्थ स्थानी आहे. फुफ्फुसाचा आजार होण्यापुर्वी रुग्ण आपल्या उत्पन्नाच्या सरासरी १५ टक्के खर्च धुम्रपानावर खर्च करतात आणि त्यातून होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी उत्पन्नाच्या ३० टक्के रक्कम मोजावी लागते. स्वत: डॉक्टरांनी केलेल्या सर्वेतून हे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. (प्रतिनिधी)
कसली ही जीवघेणी फॅशन?
एकूण धूम्रपान करणाऱ्या लोक ८० टक्के सिकगारेटचा वापर करतात तर १५ टक्के लोक विडीचा वापर करतात. ५ टक्के लोक धूम्रपानासाठी हुक्का, चिलम यासारख्या साधनांचा वापर करतात. इंडियन इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस या संस्थेच्या एका सर्वेक्षणानुसार धूम्रपानामुळे दरवर्षी ५ टक्के लोकांचा मृत्यू होतो. यात पुरूषांच्या मृत्यूशी टक्केवारी ११.१ असून ४.५ टक्के महिलांचा समावेश आहे. शिवाय २०३० मध्य धूम्रपान हे मृत्यूसाठी प्रमुख तिसरे कारण ठरणार असल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट करण्यात आले आहे. रफ-टफ कपडे, ट्रेंडी शूज, डोळ्यांवर गॉगल आणि ओठात सिगारेट अशी आजच्या तरूण पिढीची फॅशन झाली आहे. परंतु तीच घातक ठरत आहे.
पाकिटावर लिहिलंय,
पण वाचते कोण?
धूम्रपान आरोग्यासाठी धोकादायक आहे, असा इशारा सिगारेटच्या पाकिटावर लिहूनही सिगारेट ओढणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सिगारेटच्या धुरात वायू, बाष्पे व जलकणांचा समावेश असतो. धूम्रपान केल्याने फुफ्फुसात सर्वसाधारणपणे ०.५ मायक्रॉन एवढे आकारमानाने कण गोळा होतात, तर सिगारेटच्या जळत्य टोकाचे तापमान सुमारे ८८४ अंश सेल्सिअसपर्यंत असते. एक सिगरेट ओढताना सुमारे ४ हजार हानीकारक तत्वे फुफ्फुसात प्रवेश करतात. सिगारेटच्या धुरात निकोटीनसह पिरिडीन, नायट्रोजनयुक्त कार्बनी संयुगे, आयसोप्रिनॉइड संयुगे, बाप्पनशील अम्ले, टारसदृश पदार्थ, फिनॉलिकसारख्या पदार्थांचा समावेश असतो.
श्वसनाच्या आजाराला कारणीभूत
भारताने आरोग्य क्षेत्रात बरी प्रगती केली आहे. मागील काही वर्षांत आपण देवी, कांजण्या, पोलिओ यासारख्या मोठ्या आजारार नियंत्रण मिळविण्यात यशस्वी झालो आहोत. परंतु क्षयरोग (टीबी) या रोगावर नियंत्रण मिळविण्यात अद्याप यश आलेले आहे. या रोगामुळे दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडतात. सरकारी यंत्रणेवर टीबीला नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. काही अंशी यावर नियंत्रण मिळाले असले तरी देखील संपूर्ण पणे यात यश मिळालेले नाही. भारतीयांना टीबी होण्याचे दोन मुख्य कारणात प्रदूषण व धूम्रपानाचा समावेश होतो. भारतीयांना श्वसनाचे अनेक नवे आजार होत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
पॅसिव्ह स्मोकिंगही घातकच
धूम्रपानामुळे श्वसनविकार म्हणून संबोधले जाणारे दमा, अस्थमा, सीओपीडी (क्रोनिक आॅब्सेटरी पल्मोनरी डीसिज), क्षयरोग, फुफ्फुसाचा कॅन्सर, मुखरोग, अन्ननलिकेचा कॅन्सर आदी आजार होतात. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीचे आयुष्यमान सहा ते दहा वर्षांनी कमी होते. १३ ते १५ वयाच्या २७ टक्के किशोरांमध्ये पॅसिव स्मोकिंगमुळे प्रकृतीवर ४० टक्के प्रभाव दिसून येतो. घरात धूम्रपान करणाऱ्या लोकांची संख्या लेखील बरीच मोठी आहे. एकूण धुम्रपान करणाऱ्या लोकांपैकी ७० टक्के लोक धूम्रपान करतात. यामुळे त्याच्या घरातील लोकांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे.
व्यसनापासून परावृत्त करावे
जगभरात फुफ्फुसाच्या आजाराने दगावणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंगणिक वाढ होत आहे. जनजागृती होत असली त्याचा सरळ प्रभाव मनुष्याच्या मानसिकतेवर होत नाही. व्यसन हे नेहमी घातक असते, असे आपण नेहमी बोलतो. परंतु त्यापासून परावृत्त होणारी संख्या फार कमी आहे. आजची राहणीमान व ट्रेंडी फॅशनमुळेही यासारख्या आजारांना खतपाणी मिळत आहे. व्यसन होत असताना आणि ’ते’ पदार्थ शरिराला अपायकारक असतानाही मनुष्य ती कृती करीत असतो. मानवी वर्तन सुधारण्याची गरज असून बुद्धीवंतांनी याकडे आवर्जुन लक्ष द्यायला हवे.
डॉ.पराग डहाके