बर्फ फोडून काढणारे लो टेंपरेचर प्लास्टिक एक्स्प्लोसिव्ह.....; भंडाऱ्याच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट कसा झाला
By नरेश डोंगरे | Updated: January 24, 2025 21:10 IST2025-01-24T21:09:56+5:302025-01-24T21:10:19+5:30
चौकशीसाठी तज्ञांची पथके दाखल. स्फोटाचे कारण जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या तज्ञांच्या चमू भंडारा येथे बोलवून घेण्यात आल्या आहेत.

बर्फ फोडून काढणारे लो टेंपरेचर प्लास्टिक एक्स्प्लोसिव्ह.....; भंडाऱ्याच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट कसा झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बर्फाळ प्रदेशाला फोडून काढण्याची क्षमता ज्या फुटकांमध्ये असते. त्या 'लो टेंपरेचर प्लास्टिक एक्सप्लोसिव्ह'ची निर्मिती भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत केली जाते. आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात असताना येथे हा शक्तिशाली स्फोट झालाच कसा, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर सुरक्षा यंत्रणा आणि संबंधित तज्ञांनाही पडला आहे.
त्यामुळे स्फोटाचे कारण जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या तज्ञांच्या चमू भंडारा येथे बोलवून घेण्यात आल्या आहेत.
भंडार्याच्या ऑडनस फॅक्टरी मध्ये आज झालेल्या भीषण स्फोटाने पुन्हा एकदा अशा अतिसंवेदनशील ठिकाणी काम करणाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. भंडारा शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर साहुली गावाजवळ ही ऑडनस फॅक्टरी आहे. तेथील सूत्रांच्या माहितीनुसार, हजारावर कामगार तिथे वेगवेगळ्या सेक्शनमध्ये आणि वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये काम करतात. येथे अत्यंत उच्च दर्जाची स्फोटके तयार केली जातात. खास करून त्यांचा वापर भारतात हल्ले करून बर्फाळ प्रदेशात दडून बसणाऱ्या दहशतवाद्यांविरुद्ध होतो. खास करून पाक व्याप्त काश्मीर मध्ये भारताविरुद्ध कट-कारस्थान रचून तेथील दहशतवादी भारतात येतात आणि घातपात घडवून निरपराध नागरिकांचे बळी घेतात नंतर हे दहशतवादी बर्फाळ प्रदेशात दडून बसतात.
अशा दहशतवाद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी ज्या स्फोटकांचा (बारूद) वापर केला जातो. त्याला लो टेंपरेचर प्लास्टिक एक्सप्लोसिव्ह (एलटीपीई)म्हटले जाते. ही स्पोटके एवढ्या उच्च क्षमतेची असतात की ती चक्क बर्फातही शक्तिशाली स्फोट घडवून आणू शकतात. दुसऱ्या शीर्षस्थ सूत्रानुसार रॉकेट लॉन्च करण्यासाठी जो दारूगोळा वापरला जातो. तो सुद्धा येथे तयार केला जातो.
भंडाराच्या फॅक्टरीत हीच वेगवेगळी स्फोटके तयार करण्याची प्रक्रिया सुरू असताना आज दुर्दैवाने स्फोट झाला आणि त्यात सात जणांचा बळी गेला. हा स्फोट नेमका कसा झाला, ते घटनेच्या नऊ तासानंतरही स्पष्ट झालेली नाही. त्याचा छडा लावण्यासाठी नागपूरातून सेंट्रल फॉरेनसिक टीमसह, संबंधित तज्ञांची पदके भंडाऱ्यात आज सायंकाळी दाखल झाली. त्यांनी स्फोटाच्या कारणांचा तपास सुरू केला आहे.
स्फोटाचे कारण जाणून घेण्यासाठी संबंधित तज्ञांना बोलविण्यात आले आहेत. ते सूक्ष्म तपासणी करतील आणि स्फोट नेमका कसा घडला, ते सांगतील. याबद्दल लगेच काही बोलणे योग्य होणार नाही.
-संजय कोलते
जिल्हाधिकारी भंडारा.
येथे आरडीएक्ससह अतिउच्च दर्जाची स्फोटके आहेत. त्यांच्या मिश्रणातून वेगवेगळ्या प्रकारचे एलटीपीई तयार करण्याचे काम सुरू होते. त्याला कसे इग्नेशियन मिळाले आणि कसा स्फोट झाला, हे इतक्या लवकर कळणे शक्य नाही. त्याचा तपास लावण्यासाठी संबंधित पथकांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्या विश्लेषणानंतर स्फोट कसा झाला, ते सांगता येईल.
-दिलीप भुजबळ
विशेष पोलीस निरीक्षक, नागपूर परिक्षेत्र.