Loss of farmers in Tumsar, Mohadi, Pawani | तुमसर, मोहाडी, पवनीत शेतकऱ्यांचे नुकसान

तुमसर, मोहाडी, पवनीत शेतकऱ्यांचे नुकसान

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : पीक नुकसानीचा सर्वे करुन आर्थिक मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : यावर्षी पावसाची संततधार कायम राहिल्याने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आनंदीत होता. मात्र सद्यस्थितीत धान गर्भावस्थेत असल्याने तसेच हलक्या व मध्यम प्रतीचे वाण परिपक्व झाल्याने काही ठिकाणी धान कापणीला सुरुवात झाली होती. परंतु दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे तुमसर, मोहाडी, पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी धानपीक आडवे झाले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
तुमसर तालुक्यातील रोंघा, मंगरली, लोहारा, गायमुख, रामपूर यासारख्या इतरही गावांमध्ये १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या वादळी पावसामुळे धानपीक जमीनदोस्त झाले आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी कृषी विभागासह महसूल विभागाने वेळीच दखल घेऊन नुकसानग्रस्त धानपीकांचे प्रत्यक्ष मोका पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
गत आठवड्याभरापासून वातावरण ढगाळ राहत असल्याने तूर पीकालाही फटका बसत आहे. किडींचा प्रादूर्भाव वाढत असून निसर्गाच्या फटक्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी भेटी देत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार करूनही अनेक ठिकाणी अद्याप पंचनामे झालेले नाहीत. त्यातच अनेक शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदवूनही अनेकांना याचा लाभ मिळत नसल्याने योजनेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. दरवर्षीच येणाऱ्या गारपीट, चक्रीवादळ तसेच तडाख्याच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही पीक विमा योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे संतप्त शेतकरी कृषी विभागाकडे चकरा मारत आहेत. मात्र याची अंमलबजावणी जिल्हा राज्य पातळीवरून होत असल्याने अद्यापही अनेक ठिकाणी शेतकरी या योजनेत पात्र ठरलेले नाही. अनेक ठिकाणी भातपीक आडवे झाले आहे. पडलेल्या भातपीकामुळे हे सडण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे हलके व मध्यम प्रतीचे कापणीयोग्य झालेले धान डोळ्यादेखत सडत असल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे.

रबी हंगामही लांबणीवर

अनेक ठिकाणी झालेल्या पावसामुळे तसेच धानपीक निघण्यासाठी उशीर असल्याने शेतकऱ्यांना रबी हंगामासाठी उशीर होत आहे. काही ठिकाणी सोयाबीन पीक निघाले असले तरी अद्याप मशागत न झाल्याने शेतकºयांना गहू, हरभरा पिकाच्या पेरणीसाठी शेताची मशागत करता आलेली नाही. त्यामुळे रबी हंगामातील पिकांच्या पेरणीला उशीर होणार असल्याचे चित्र आहे.

Web Title: Loss of farmers in Tumsar, Mohadi, Pawani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.