ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप
By Admin | Updated: August 19, 2014 23:32 IST2014-08-19T23:32:31+5:302014-08-19T23:32:31+5:30
शालेय पोषण आहार अफरातफर प्रकरणी दोषींवर कारवाई आणि शिक्षकाच्या बदलीच्या मागणीसाठी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेला गावकऱ्यानी आज कुलूप ठोकले. यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली.

ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप
विरली बु. : शालेय पोषण आहार अफरातफर प्रकरणी दोषींवर कारवाई आणि शिक्षकाच्या बदलीच्या मागणीसाठी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेला गावकऱ्यानी आज कुलूप ठोकले. यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली.
पाहुणगाव येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ७ वर्ग असून १५२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत मागील वर्षीचे सत्रात ८८ किलो तुरडाळ, ३२ किलो चना, ३० किलो मजूर दाळ असे दीड क्विंटल धान्य शिल्लक होते. मुख्याध्यापक डी.के. जळीत यांनी शाळेतीलच एका शिक्षकाला धान्य विकल्याची माहिती गावात कळली. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी दोषीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. त्याच प्रमाणे येथील सहायक शिक्षक आर.एम. तोंडरे यांच्या बदलीसाठी शाळा व्यवस्थापन समितीने २ मे २०१३ ला ठराव घेवून गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे बदलीची मागणी केली होती. शिक्षक मुख्यालय राहत नसल्याने त्यांचा घरभाडे भत्ता बंद करावा, पोषण आहार शिजविण्याचे काम महिला बचत गटाकडे कायम ठेवावे आदी मागण्यांसाठी संतप्त गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले. याची माहिती गटशिक्षणाधिकारी डी.के. पडोळे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी टी.बी. अंबादे, एल.डब्ल्यु. मेश्राम यांनी शाळेला भेट देवून गावकऱ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकरी सहायक शिक्षक तोंडरे यांच्या बदलीवर ठाम राहिल्याने अधिकाऱ्यांना आल्यापावली परतावे लागले. यावेळी सरपंच देविदास राऊत, शाळा व्यवस्थापन समितीचे ईश्वर दोनाडकर, कविता हटवार, उपसरपंच गोपाल मेंढे, वर्षा मेश्राम, उषा खरकाटे, अभिमन ढोंगे, दिनेश कोरे, राजेंद्र कोरे, शिवशंकर वाघमारे, हरीदास पोराम, वासूदेव तोंडरे, अन्ना गायधने उपस्थित होते. (वार्ताहर)