'पशुधन विमा' ठरतोय शेतकऱ्यांना लाभदायी
By Admin | Updated: August 12, 2016 00:33 IST2016-08-12T00:33:57+5:302016-08-12T00:33:57+5:30
शेतकऱ्यांना व पशुपालकांना जनावरांच्या मृत्यूमुळे होणाऱ्या प्रासंगिक हानीपासून वाचविण्याकरिता बचावतंत्रासाठी पशुधन विमा योजना आहे.

'पशुधन विमा' ठरतोय शेतकऱ्यांना लाभदायी
भंडारा : शेतकऱ्यांना व पशुपालकांना जनावरांच्या मृत्यूमुळे होणाऱ्या प्रासंगिक हानीपासून वाचविण्याकरिता बचावतंत्रासाठी पशुधन विमा योजना आहे. केंद्र प्रायोजित या योजनेत गुरांचा जास्तीत जास्त बाजार भावाइतका विमा काढला जातो. विमा हफ्त्यावर शासनाचे अनुदान मिळत असल्याने ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरत आहे. गुरांच्या मृत्युनंतर शेतकऱ्यांना हानी पोहोचू नये तसेच पशुधन व त्यापासूनच्या उत्पादनात गुणवत्तापूर्ण सुधारणा करणे हे या पशुधन विम्याचे उद्दीष्ट आहे.या योजनेनुसार भारतीय अथवा मिश्र जातीच्या दुभत्या गाई-म्हशींचा आजच्या बाजारभावाइतक्या रकमेचा विमा काढला जातो व विम्याच्या हफ्त्यापोटी शासन अनुदान देते. प्रत्येक लाभार्थीच्या जनावरांचा अधिकाधिक कालावधीसाठी विमा काढला जातो. योजनेत भारतीय अथवा मिश्र जातीच्या दुभत्या गाई-म्हशींचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष दूध देणाऱ्या, आटलेल्या तसेच पुन्हा गाभन असलेल्या जनावरांचाही समावेश करण्यात येणार आहे. कुठल्याही इतर विमा योजनेच्या अंतर्गत असलेल्या पशुधनास या योजनेत सहभागी करता येणार नाही. अनुदानाचा लाभ दर लाभार्थीच्या दोन जनावरांपर्यंतच मर्यादित आहे आणि एका जनावरावर तीन वर्षाच्या कालावधीसाठी एक मुदत विमा (वन टाईम इन्शूरन्स) दिला जात आहे. कानांच्या टॅगिंगची परंपरागत पद्धत किंवा मॉयक्रोचिप्स चिटकविण्याच्या सद्याच्या तंत्राचा वापर विमा काढताना केल्या जाऊ शकतो. ओळखचिन्ह चिकटविण्यासाठी सध्याच्या तंत्राचा वापर केला जातो. चिन्ह चिकटविण्याची किंमत विमा कंपनीने भरावयाची आहे. (नगर प्रतिनिधी)