युवकाच्या सतर्कतेने लाखो मधमाश्यांना जीवनदान

By Admin | Updated: October 19, 2015 00:52 IST2015-10-19T00:52:33+5:302015-10-19T00:52:33+5:30

मानवाच्या जगण्यासाठी मधमाशांचे अस्तित्व महत्वाचे आहे. परंतु मनुष्याच्या अमानवीय कृतीमुळे मधमाशांची संख्या कमी होत असून त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

Livelihood of millions of bees | युवकाच्या सतर्कतेने लाखो मधमाश्यांना जीवनदान

युवकाच्या सतर्कतेने लाखो मधमाश्यांना जीवनदान

वन्यप्रेमींमध्ये आनंद : मधमाशीविना मानवसृष्टी उपाशी मरेल?
हरिश्चंद्र कोरे विरली बु.
मानवाच्या जगण्यासाठी मधमाशांचे अस्तित्व महत्वाचे आहे. परंतु मनुष्याच्या अमानवीय कृतीमुळे मधमाशांची संख्या कमी होत असून त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यांना वाचविण्यासाठी समाजात जाणीवजागृती निर्माण होण्याची गरज आहे. अशातच विरली बु. येथील एका युवकाच्या सतर्कतेने लाखो मधमाशांंना मरण्यापासून वाचविले असून त्यांना जीवनदान दिले आहे.
विरली बु. किटाळी मार्गावरील एका बाभळीच्या झाडावर सुमारे १२ ते १५ मधमाशांची पोळे वसाहती करून आहेत. या मधमाशांवर परिसरातील मध गोळा करणाऱ्यांची नजर होती. याची जाणीव विरली बु. येथील शेखर धनपाल सिंगाडे या युवकाला होती. त्याने अन्य आपल्या मित्रांच्या मदतीने यावर पाळत ठेवली होती. अशातच मध गोळा करणारा एक गट तेथे मधसंकलनासाठी आला. या युवकांनी त्यांना तेथून हुसकावून लावले. आणखी दोन दिवसांनी दुसऱ्या गावातील तसाच एक गट तेथे आला. त्यांना सुद्धा पळवून लावले. एवढेच नाही तर त्या मध गोळा करणाऱ्या गटाला मधमाशांच्या संबंधाने प्रबोधन केले आणि मधमाशांचे शास्त्रशुद्ध मध संकलन प्रशिक्षणासाठी त्यांची नोंद करून घेतली.
जैवविविधता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ग्रामीण भागात जाणीवजागृती होत नसल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. मधमाशांचे अस्तित्व हे मनुष्य दृष्टीसाठी लाभदायक आहे. परंतु या मधमाशांच्या विरोधातच काम चालले आहे. मध संकलन करणारे गट प्रत्येक गावात आहेत. परंतु मध संकलन करताना अमानवीय कृत्याने मधाचे संकलन केले जाते. पारंपारिक पद्धतीने मध संकलन करताना अतिशय हिंसक पद्धतीने मधमाशांना जाळण्यात येते. याशिवाय पोळ्यांची मोडतोड करण्यात येते.
यामध्ये असंख्य मधमाशा मारल्या जातात. तसेच त्यांच्या अंडी पिलांचा नाश होतो. परिणामी मधमाशांची निसर्गातील संख्या कमी होत असून याचा विपरित परिणाम विविध कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनांवर होतो आहे. त्यामुळे उत्पादन कमी झाले तर मानवसृष्टीवर असमतोल होण्याची शक्यता आहे. पर्यायाने मधमाशीविना मनुष्यसृष्टी उपाशी मरेल काय? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आहे.
या जागरूक युवकांच्या कृतीने असंख्य मधमाशांना जीवनदान मिळाले आहे. यासाठी ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव कोरे, शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनी येथील प्राणिशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.बी.एस. रहिले, पाणलोट समितीचे सचिव राजेश महावाडे, सामाजिक कार्यकर्ते शिलमंजू सिव्हगडे, अखिल कोरे, भास्कर ब्राम्हणकर, विलास महावाडे यांनी समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)

मधमाश्यांविषयी महत्त्वाचे
मधमाशा शांतताप्रिय असतात. मधमाशा स्वत:हून हल्ला करीत नाहीत.
निसर्गातील फुलांतून पराग आणि मकरंद घेऊन मधमाशी मध निर्माण करते.
एक मधमाशी दररोज ५०० ते ७०० फुलांना भेट देतात. यामध्ये फुलांचे परागीभवन होऊन पिकांचे उत्पादन वाढते.
एका पोळ्यामध्ये सुमारे २० ते २५ हजार मधमाशा असतात.
एक मधमाशी ३ कि.मी. परिसरातून मकरंद आणि पराग गोळा करते.

Web Title: Livelihood of millions of bees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.