नदीत बुडणाऱ्या वृद्धाला जीवदान

By Admin | Updated: November 1, 2014 00:41 IST2014-11-01T00:41:06+5:302014-11-01T00:41:06+5:30

दुर्धर आजाराने कंटाळलेल्या एका ८२ वर्षीय वृद्धाने आत्महत्या करण्यासाठी शुक्रवारला सकाळी वैनगंगा नदीत उडी मारली.

Lived to the drowning of the river | नदीत बुडणाऱ्या वृद्धाला जीवदान

नदीत बुडणाऱ्या वृद्धाला जीवदान

भंडारा : दुर्धर आजाराने कंटाळलेल्या एका ८२ वर्षीय वृद्धाने आत्महत्या करण्यासाठी शुक्रवारला सकाळी वैनगंगा नदीत उडी मारली. परंतु नदी काठावर असलेल्या वैनगंगा तैराकी मंडळाच्या सदस्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत या वृद्धाचे प्राण वाचविले. या सदस्यांनी पोलिसांना माहिती देऊन बोलाविले त्यानंतर पोलीस कर्मचारी त्या वृद्धाला घेऊन पोलीस ठाण्यात गेले.
झडीराम भोयर रा.गुंथारा, ता.भंडारा असे जगण्याला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या या इसमाचे नाव आहे. वैनगंगा तैराकी मंडळाचे सदस्य प्रशांत कारेमोरे, राजेश चोपकर, विश्वनाथ कुकडे, विलास घाटबांधे, जवाहर राजाभोज, पप्पू मिश्रा हे दररोज पोहण्यासाठी वैनगंगा नदीवर जातात. तिथून परतण्याच्या वेळी त्यांना नदीच्या धोबीघाटावर कपडे धुणाऱ्या महिलांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्याकडे लक्ष केंद्रीत केले असता त्यांनी लहान पुलावरुन एका म्हाताऱ्याने उडी मारल्याचे सांगितले. तो म्हातारा पाण्यात बुडत असल्याचे दिसताच वेळ न दवडता तैराकी मंडळाच्या सदस्यांनी पाण्यात उडी मारुन त्याला बाहेर काढले. काही वेळेनंतर शुद्धीवर आलेल्या त्या म्हाताऱ्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव झडीराम भोयर असल्याचे सांगितले.
भंडारा शहरानजिक असलेल्या गुंथारा येथील रहिवाशी आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या मुलीचा मृत्यु झाला. त्यालाही आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे जीवनाला कंटाळला आहे. आरोग्य जीवनदायिनी योजनेचा त्यांना लाभ मिळत नाही. परिणामी आजारावर उपचार करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. कानात सोन्याच्या बाऱ्या असलेल्या झडीरामने प्राण वाचविलेल्या तरुणांना माझ्या बाऱ्या घ्या पण मला मरु द्या, असे म्हणून लागला. त्यानंतर या तरुणांनी पोलिसांना बोलाविले असता पोलीस शिपाई कुर्झेकर, नान्हे वैनगंगा नदी परीसरात दाखल झाले. पोलिसांनी त्याची चौकशी करुन असा प्रयत्न करु नको, असे सांगून घरी नेऊन सोडले. (जिल्हा प्रतिनिधी)
प्राण वाचविण्यात आल्या अडचणी
वैनगंगा तैराकी मंडळाचे सदस्य प्रशांत कारेमोरे आणि राजेश चोपकर यांनी घटनेनंतर सांगितले की, वैनगंगा नदी पुलावरुन आत्महत्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. नदीत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अनेकांना मंडळाच्या सदस्यांनी वाचविले आहे. मानवतेमुळे आम्ही अशा जोखिमी घ्याव्या लागतात. परंतु आत्महत्या करण्याच्या इराद्याने बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी येतात. कारण बाहेर येण्यासाठी त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. आज झडीरामनेही हाथ समोर केलेले नव्हते. परंतु प्रयत्नांती त्याला बाहेर काढण्यात यश आल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Lived to the drowning of the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.