कन्हाळगाव, मेंढा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:47+5:302021-07-08T04:23:47+5:30
लाखांदूर : जंगलव्याप्त परिसरात असलेल्या तालुक्यातील कन्हाळगाव व मेंढा परिसरात गत काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, या भागातील ...

कन्हाळगाव, मेंढा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
लाखांदूर : जंगलव्याप्त परिसरात असलेल्या तालुक्यातील कन्हाळगाव व मेंढा परिसरात गत काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण दिसून येत आहे. गत काही दिवसांपासून बिबट्या येथील प्राण्यांवर डल्ला मारीत असून, नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, ६ जुलै रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास तालुक्यातील मेंढा या गावात घरालगत असलेल्या शेळ्यांच्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश करीत एक शेळी फस्त तर अन्य दोन शेळ्या जखमी केल्याची घटना घडली. दादाजी दिघोरे (रा. मेंढा) असे पीडित पशू मालकाचे नाव असून, या नुकसानीत पीडित पशू मालकाचे जवळपास १० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.
या परिसरातील बहुतेक नागरिक हे शेतकरी असून शेतीला जोड व्यवसाय म्हणून गत अनेक वर्षांपासून पशुपालनाचा व्यवसाय करीत आहेत. या पशुपालनांतर्गत शेळी, गाय, म्हैस, बैल या पाळीव जनावरांचा शेतीकामासाठी, दुधासाठी व अन्य उपयोगासाठी व्यवसाय केला जातो. येथील नागरिक संबंधित पाळीव जनावरांना दिवसा जंगलातून चारून आणून संध्याकाळच्या सुमारास घरालगत असलेल्या गोठ्यात बांधून ठेवतात. मात्र रात्रीच्या सुमारास जंगलव्याप्त परिसरातील जंगली प्राणी जसे की बिबट्या थेट गावात प्रवेश करून घरालगत असलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवत त्यांना फस्त करतात.
मागील आठवड्यात कन्हाळगाव येथील शेतकऱ्याच्या घरालगतच असलेल्या गोठ्यातून बिबट्याने शेळी फस्त केल्याची घटना उघडकीस आली होती. परिसरात अद्याप जंगली प्राण्यांद्वारे कुठलीही मनुष्यहानी झाली नसली तरी जंगली प्राण्यांकरवी पाळीव प्राण्यांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे या परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
प्रतिक्रिया :
वनविभागाने लक्ष देण्याची गरज
कन्हाळगाव , मेंढा परिसरात गत काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून गत आठवडाभरात दोन भिन्न ठिकाणी शेळ्या फस्त केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. जंगली प्राण्यांच्या गावात शिरकावाने परिसरातील नागरिक चांगलेच धास्तावले असून याकडे वनविभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी व्यक्त केले.
प्रतिक्रिया :
नागरिकांनी सजग राहावे :
कन्हाळगाव, मेंढा परिसरात गत काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली आहे. त्यानुसार संबंधित परिसरात वन अधिकारी कर्मचाऱ्यांची गस्त वाढविली असून बचावासाठी विविध उपाययोजनादेखील आखल्या जात आहेत. नागरिकांनीदेखील रात्रीच्या वेळी त्यांची पाळीव जनावरे बंद गोठ्यात बांधावीत, घराच्या आसपास असलेले दिवे सुरू ठेवावेत, घरासभोवताली वाढलेला केरकचरा स्वच्छ करून परिसर मोकळा करावा यांसह काही असल्यास वनविभागाला कळवावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावीत यांनी केले आहे.