स्वसंरक्षणाचे धडे शिकून समाजात परिवर्तन घडवा
By Admin | Updated: March 16, 2016 08:34 IST2016-03-16T08:34:35+5:302016-03-16T08:34:35+5:30
महिलांकडे बघण्याच्या मानसिकतेत बदल झाला आहे. त्यांच्याकडे स्वावलंबी, सक्षम म्हणून बघितल्या जात असले तरी ..

स्वसंरक्षणाचे धडे शिकून समाजात परिवर्तन घडवा
जवाहरनगर येथे महिला मेळावा : मोहबंशी यांचे प्रतिपादन
जवाहरनगर : महिलांकडे बघण्याच्या मानसिकतेत बदल झाला आहे. त्यांच्याकडे स्वावलंबी, सक्षम म्हणून बघितल्या जात असले तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे स्त्री-पुरुष समानतेमधील दरी वाढत आहे. दारुबंदी आणि इतर व्यवसनाधिनतेला आळा घालणे, हुंडाप्रथेचे आव्हान, स्त्री भ्रूणहत्या हे स्त्रीपुढील आव्हान, चित्रपटमध्ये स्त्री देहाचे चित्रीकरण अशा सामाजिक घटनांना महिलांना तोंड द्यावे लागते. अशावेळी महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे शिकून समाजात परिवर्तन घडवून आणावे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.अजय मोहबंशी यांनी केले.
जवाहरनगर येथील कला, वाणिज्य पदवी महाविद्यालयात आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा.निलीमा इंगोले, डॉ.एम.के. उमाठे, प्रा.डॉ.साधना वाघाडे, प्रा.डॉ.अनिता वंजारी, प्रा.डॉ.सुनीता रविदास, प्रा.डॉ.नलिनी बोरकर उपस्थित होते.
यावेळी प्रा.निलीमा इंगोले म्हणाल्या, स्त्री ही कुटुंबाचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. पिता हा घराला सुरक्षित करतो. तर माता ही घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात आत्मविश्वास निर्माण करते. आपल्या मुलांना वेळ प्रसंगानुरुप मित्र मैत्रीणीच्या भूमिकेतून एक आत्मविश्वास देऊन नव नवीन आव्हानांना पेलण्याचे सामर्थ्य देते. स्त्रीने तरुणांमधील वाढत्या व्यसनाधिनतेला आळा घालण्याचे आव्हान, पूर्ण क्षमतेने स्वीकारावे. आधुनिक महिलांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात समर्थपणे पुढे जावे. स्वत:मधील कलागुण व कौशल्यावर आधारित विविध व्यवसाय समर्थपणे करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावावे. कुटुंबाचा आर्थिक दर्जा उंचावण्यास मदत होते. सशक्तीकरणाने, सबलीकरणाने परिवर्तन होते आणि व्यक्ती स्वातंत्र्याला प्रोत्साहन प्राप्त होते. शिक्षण आणि उच्च शिक्षण आर्थिक आत्मनिर्भर होण्यास मदत होते व महिलांचा सामाजिक स्तर वाढून सबलीकरण होते.
प्रा.डॉ.साधना वाघाडे यांनी प्रास्ताविकातून महिला या शक्तीतील ‘मही’ म्हणजे पृथ्वी जो सर्वात प्रबळ व शक्तीशाली आहे. ‘मही’लाच ला जोडल्यास बनणारी महिला ही सामर्थ्यवान, शक्तीशाली आहे. संचालन प्रा.डॉ.सुनिता रविदास तर आभारप्रदर्शन प्रा.अनिता वंजारी यांनी केले. कार्यक्रमाला प्रा.पौर्णिमा रहांगडाले, प्रा.डॉ.बोरकर, प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. (वार्ताहर)