‘त्या’ मार्गावर प्रवासी निवाऱ्याचा अभाव
By Admin | Updated: April 2, 2016 00:38 IST2016-04-02T00:38:59+5:302016-04-02T00:38:59+5:30
वैनगंगा नदी पात्रात बांधकाम करण्यात आलेल्या धरणाने सिहोरा परिसर वाशियांचे तिरोडा शहराला जोडणारे अंतर कमी झाले असले तरी ...

‘त्या’ मार्गावर प्रवासी निवाऱ्याचा अभाव
प्रवाशांना झाडांचा आश्रय : अरूंद रस्त्यामुळे अपघाताची शक्यता
चुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा नदी पात्रात बांधकाम करण्यात आलेल्या धरणाने सिहोरा परिसर वाशियांचे तिरोडा शहराला जोडणारे अंतर कमी झाले असले तरी या मार्गावर निवारे नसल्याने प्रवाशाचे हाल होत आहे.
अदानी वीज प्रकल्प व धापेवाडा उपसा सिंचन योजनेला पाणीपुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदीवर धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणाने वर्षभरात पूर्णत्वाची मागणी आहे. सिहोरा परिसरातील नागरिकांना तिरोडा शहर गाठण्यासाठी ६० कि़मी. चे अंतर गाठावे लागत असताना धरणाच्या बांधकामामुळे १३ कि.मी. अंतर पर्यत आले आहे. या धरणावरून वाहतुकीत वाढ झाली आहे. गोंदियाचे अंतर कमी झाले आहे. यामुळे नागरिकांना सोयीचे झाले आहे. दिवस आणि रात्र या मार्गावर वर्दळ सुरू झाली आहे. सिहोरा ते तिरोडा या मार्गावर असणाऱ्या गावात सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाही. तिरोडा आगारांच्या बस फेऱ्या चांदपुर देवस्थानपर्यंत दिवसभर धावत आहेत. या मार्गावर सिलेगाव, वाहनी, वांगी, मांडवी, पिपरी चुन्ही, कवलेवाडा, रेल्वे स्टेशन तिरोडा, पंचायत समिती तिरोडा तथा ४ गावांना जोडणारा चौक आहे, परंतु या गावात प्रवाशी निवारे नाहीत. यामुळे प्रवाशी निश्चित ठिकाणी थांबत नाही, असे करित असताना बस चालकाला हात दाखविल्यास बस थांबविण्यास प्रतिसाद देत नाही. प्रवाशांनी कुठे थांबावे हे आता कळेनासे झाले आहे.
मांडवी चौकात प्रवासी निवारा नसल्याने झाडांचा आसरा प्रवाशांना होण्याची पाळी आली आहे. या चौकात पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी साधे हातपंप नसल्याने प्रवाशाची कसरत होत आहे. एकाही गावात प्रवासी निवाऱ्यांचे बांधकाम झाले नसल्याने पावसाळ्यात प्रवाशांचे हाल हाल होणार आहे. या मार्गावर तुमसर व तिरोडा विधानसभा अंतर्गत गावे आहे. एकाच पक्षाचे आमदार आहेत. प्रवासी निवाऱ्याची समस्या निकाली काढण्याची गरज आहे. याशिवाय सिहोरा ते तिरोडा या १३ कि़मी. मार्गाची दुरवस्था झाली आहे. अरूंद रस्त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. हा मार्ग एकेरी ठरतो आहे. या मार्गाचे नूतनीकरण व प्रवासी निवारे मंजुर करण्यासाठी या आधी जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा कटरे, पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र ढबाले यांनी पत्रव्यवहार केला आहे. परंतु समस्या निकाली काढण्यात आली नाही.
यामुळे प्रवासी व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तिरोडापर्यंत जोडणाऱ्या या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही. नाही. पावसाळ्यात वाहन धारकांना कसरत करावी लागत आहे. डांबरीकरण व प्रवाशी निवारे बांधकाम करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)