लाखनीत मुलभूत सुविधांचा अभाव

By Admin | Updated: August 18, 2014 23:19 IST2014-08-18T23:19:42+5:302014-08-18T23:19:42+5:30

साकोली तालुक्यातून १ मे २००० मध्ये विभक्त झालेल्या लाखनी तालुक्याला १४ वर्षाचा कालावधी लोटला मात्र विकास रखडलेलाच आहे. मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असल्याने तालुकावासीयांमध्ये असंतोष पसरला आहे.

Lack of default infrastructure | लाखनीत मुलभूत सुविधांचा अभाव

लाखनीत मुलभूत सुविधांचा अभाव

लाखनी : साकोली तालुक्यातून १ मे २००० मध्ये विभक्त झालेल्या लाखनी तालुक्याला १४ वर्षाचा कालावधी लोटला मात्र विकास रखडलेलाच आहे. मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असल्याने तालुकावासीयांमध्ये असंतोष पसरला आहे.
लाखनी तालुक्यात अन्न, वस्त्र, निवारा आरोग्य शिक्षण या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. २५ हजार २४७ हेक्टर लागवडीलायक क्षेत्र असूनसुद्धा धान पिकविणारा शेतकरी कर्जबाजारी आहे. शेतकऱ्यांच्या हितार्थ १३ वर्षानंतरही विशेष सुविधा तालुक्यात नाहीत. ३६ हजार ६६८.७३ भौगोलिक क्षेत्र लाभलेल्या तालुक्याची लोकसंख्या १ लाख २२ हजार असून ७२ ग्रामपंचायती तालुका कार्यालये, पंचायत समिती कामे सांभाळत आहे. आरोग्य व शिक्षण या गरजा ग्रामीण जनतेपर्यंत पोहचू शकल्या नाहीत.
आजही तालुक्यात कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यू समस्या आहे. गरीबांच्या आरोग्य सेवेचे दरवाजे बंद झाले असून शासकीय रुग्णालये थातूर मातूर उपचाराचे केंद्र बनले आहणेत. तालुक्यात २ ग्रामीण रुग्णालये, ५ प्राथमिक आरोग्य केंद्र, २६ उपकेंद्र, ८ आयुर्वेदिक दवाखाने असून सुद्धा गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयाचा रस्ता पकडावा लागतो.
गरीबांसाठी अब्जावधी रुपयाचा चुराडा शासनाने केला व रुग्णालये बांधली. मात्र तालुक्याची आरोग्य सेवा सलाईवर आहे हे नाकारता येत नाही. अपुरा कर्मचारी व अधिकारी वर्गामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. शिक्षणाची सुद्धा गंभीर अवस्था आहे. जिल्हा परिषदेच्या ६६ प्राथमिक शाळा, २३ उच्च माध्यमिक शाळा तर पाच उच्च माध्यमिक शाळा असून माध्यमिक शाळा असून सुद्धा खासगी शिक्षण संस्थांना शाळांची खैरात वाटण्यात आली.
अवाजवी शिक्षण शुल्क आकारुन शिक्षण संस्थांनी सुविधेच्या नावावर लुटमार सुरु केली आहे. यातच कॉन्व्हेंट व सिबीएसई सारख्या पॅटर्नमुळे गरीब पाल्यांच्या शिक्षण महागले. शेती व्यवसाय प्रमुख असल्याने तालुक्यातील बळीराजा शेतीच्या मशागतीस विकास शोधत राहिला. लाखनी तालुक्यात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने स्पर्धा परीक्षेचे वातावरण नसल्याने बेरोजगारांना संधी मिळत नाही.
भंडारा जिल्ह्यात मुंबई, दिल्ली हलवून सोडण्याची ताकद असणारे नेते आहेत. मात्र ५०० ते हजार मजुरांना काम मिळेल असा एकही उद्योग असून त्यात तालुक्यातील बेरोजगारांना स्थान नाही. उच्च शिक्षण घेणारे बेरोजगार युवक आजही २ ते ३ हजार रुपयाच्या नोकरीसाठी दारोदार फिरत आहेत. अनेक बेरोजगारांनी रोजगार मिळत नसल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करतात तर मोलमजूरी करून पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो बेरोजगाराचे लोंढे शहराकडे जात असल्याने गाव ओस पडत आहेत.
लाखनी तालुक्यात लघु प्रकल्प व शेकडो मामा तलाव असून सुद्धा तालुका सिंचनाविना तहानलेलाच आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून नव्हे तर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. ही तालुक्याची विदारक स्थिती मताचा जोगवा मागणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना का दिसत नाही. कोणत्याही क्षेत्राच्या विकासात रस्ते हा महत्वाचा घटक परंतु आजही तालुक्यात अनेक गावात जायला धड रस्ते नाहीत त्या विकास खुंटलेला आहे.
लाखनी तालुक्यात अनेक शेतात जाण्यासाठी बनविण्यात आलेल्या पांदण रस्त्यावरुन जाताना सोळाव्या शतकाचे दर्शन होते. रस्ते नाही, वीज नाही, शिक्षण आरोग्याच्या सोयी नाही. रोजगार तर दूर राहिला. अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या नावावर विकासाच्या योजनाचा मध्यंतरी कोल्हे गडप करू लागले आहेत. शेतकऱ्यांसाठी लाखो रुपयाचा निधी खर्च झाल्याचे दाखविले जाते. मात्र समस्या जैसे थे आहे. त्यामुळे देशाचा गाभा असलेला शेती व शेतकरी या घटकाला विसरुन चालणार नाही. हे नेत्यांना आज सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Lack of default infrastructure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.