रोहयोच्या मजुरीपासून मजूर वंचित
By Admin | Updated: August 18, 2014 23:18 IST2014-08-18T23:18:18+5:302014-08-18T23:18:18+5:30
आलेसूर येथे महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे करणाऱ्या मजुरांना दोन महिन्यांपासून मजूरी मिळाली नाही. याप्रकरणी ग्रामरोजगार सेवकाने केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार

रोहयोच्या मजुरीपासून मजूर वंचित
तुमसर : आलेसूर येथे महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे करणाऱ्या मजुरांना दोन महिन्यांपासून मजूरी मिळाली नाही. याप्रकरणी ग्रामरोजगार सेवकाने केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार आलेसूर ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांच्याकडे दिली आहे. मात्र कारवाई थंडबस्त्यात आहे.
आलेसूर येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत दिनदयाल नरकंडे ते टीसीएम नालीपर्यंत ८०० मीटर पांदन रस्त्याचे काम ११ मार्च २०१४ ते १६ जूनपर्यंत करण्यात आले. या कामावरून काही मजुरांची मजूरी बँक खात्यात जमा झाली नाही, अशा तक्रारी ग्रामपंचायतीकडे प्राप्त झाल्या. त्याअनुषंगाने मस्टर तपासणी करण्यात आली. त्यात ग्राम रोजगार सेवकाने गैरव्यवहार केल्याचे आढळून आले.
२१ जूनला विशेष आमसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मस्टरचे वाचन करण्यात आले. त्यात बरीच बोगस नावे आढळून आली. रोजगार सेवकाने सरपंच ग्रामपंचायत कमेटी व ग्रामसेवक यांना विश्वासात न घेता स्वमर्जीने कामे करून स्वत:च्या स्वाक्षरीने मस्टर पंचायत समितीला सादर करण्याच्या चुका ग्रामपंचायत व नागरिकांच्या लक्षात आल्या. त्यामुळे ग्रामसभेत गोंधळ निर्माण झाले होते.
३० जून रोजी तीच ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी पुन्हा दोन गटात गोंधळ निर्माण झाला. ग्रामसभेच्या कार्यवृत्तात रोजगार सेवकाला काढण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामसभेत मात्र निर्णय झाला नाही. (तालुका प्रतिनिधी)