कोल्हापुरी बंधाऱ्याला भगदाड
By Admin | Updated: August 2, 2014 23:56 IST2014-08-02T23:56:07+5:302014-08-02T23:56:07+5:30
शेतकऱ्यांना सिंचनाकरिता उपयोगी ठरावे याकरिता देव्हाडी शिवारात कोल्हापुरी बंधारा तयार करण्यात आला होता. परंतु निकृष्ट बांधकामाअभावी ते कुचकामी ठरले असून मागील दोन वर्षापासून

कोल्हापुरी बंधाऱ्याला भगदाड
निधी पाण्यात : तुमसर-गोंदिया मार्गावर आहे बंधारा
तुमसर : शेतकऱ्यांना सिंचनाकरिता उपयोगी ठरावे याकरिता देव्हाडी शिवारात कोल्हापुरी बंधारा तयार करण्यात आला होता. परंतु निकृष्ट बांधकामाअभावी ते कुचकामी ठरले असून मागील दोन वर्षापासून त्याचे भगदाड दुरुस्तीचे सौजन्य दाखविण्यात येत नाही. विशेष हे की, हा मिनी कोल्हापुरी बंधारा तुमसर गोंदिया राज्य महामार्गावर आहे.
एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत कृषी विभागाने तुमसर तालुक्यात मिनी कोल्हापुरी बंधारे तयार केले होते. या बंधाऱ्याला आठ ते दहा वर्षे झाली आहेत. देव्हाडी येथे तुमसर गोंदिया राज्य महामार्गावर एमआयडीसी जवळ देव्हाडी शिवारात हा बंधारा तयार करण्यात आला होता. शेतकऱ्यांकरिता हा बंधारा जीवनदायी ठरला होता.
राज्य शासनाने मिनी कोल्हापुरी बंधाऱ्याची योजना यशस्वी राबविण्याचा दावा येथे फोल ठरला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील धान्य एका पाण्याकरिता उध्वस्त होणारे या योजनेच्या माध्यमातून आपल्या धान्याचा बचाव करू शकतील हा मुळ उद्देश होता.
जल संसाधन विकास महाराष्ट्रात सन १९८९ पासून सुरु झाली आहे. या योजनेतून ही महत्वपूर्ण बंधारे तयार केले जातात. एका पाण्याकरिता पीक नष्ट होत असेल त्याला वाचवणे या मुख्य उद्देशातून बंधारे तयार करण्यात आले होते. या बंधाऱ्याची विशेषत: अशी की, थोडासा पाऊस आला की बंधाऱ्यात पाणीसाठा भरतो. शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ होऊन शेतशिवारात पाण्याची मुबलकता उपयोगी ठरते.
या बंधाऱ्यामुळे देव्हाडी शिवारातील सुमारे ५० ते ७० हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होत होता. हा दगडी बंधारा असून पाणीसाठा अडविणाऱ्या भिंतीलाच मोठे भगदाड पडले आहे. या बंधाऱ्याची किंमत सुमारे ३ ते ४ लक्ष होती. भगदाड पडल्यानंतर तो भगदाड बुजविण्याचे सौजन्य संबंधित विभागाने दाखविले नाही. या मार्गावरून अनेक अधिकारी जातात. परंतु त्यांनी सुद्धा याची दखल घेतली नाही. उपयोेगी बंधारा सध्या निरुपयोगी ठरला आहे. (तालुका प्रतिनिधी)