लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारतीय ध्वज संहिता, २००२ आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१अंतर्गत राष्ट्रध्वजाच्या वापरासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. या नियमांचे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
तिरंगा नेहमी सन्मानजनक स्थितीत असावा. तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला नसावा. त्याचा रंग फिका पडलेला नसावा. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी प्लास्टिकच्या झेंड्यांचा वापर करण्यास मनाई आहे. केवळ कापडी झेंड्याचा वापर करावा. तिरंगा अशा प्रकारे लावावा की, तो कधीही जमिनीला, पाण्याला किंवा रस्त्याला स्पर्श करणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. नियमांचे पालन न झाल्यास कारवाई होत असते.
वाहनावर झेंडा योग्य जागा कोणती ? लावण्याचीगाडीवर तिरंगा लावण्यासाठी एक निश्चित जागा आहे. तो गाडीच्या बोनेटवर मध्यभागी किंवा गाडीच्या पुढील उजव्या बाजूला (ड्रायव्हरच्या बाजूला) एका दांड्यावर लावावा. इतर कोणत्याही ठिकाणी, जसे की गाडीच्या मागे, खाली किंवा छतावर अशास्त्रीय पद्धतीने लावणे चुकीचे आहे. चुकीच्या पद्धतीने झेंडा लावल्यास कारवाई केली जाते.
सामान्यांच्या वाहनासाठी काय नियम आहे?कायद्यानुसार, सामान्य नागरिकांना आपल्या खासगी वाहनांच्या बोनेटवर किंवा छतावर तिरंगा लावणे हे नियमांचे उल्लंघन ठरू शकते. तथापि, देशप्रेमाच्या भावनेचा आदर करत, लोक आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवर छोटा तिरंगा आदराने ठेवतात. जोपर्यंत त्याचा अपमान होत नाही, तोपर्यंत सहसा यावर कुणाकडून हरकत घेतली जात नाही.
सजावटीसाठी वापर नकोतिरंगाचा वापर कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी, जाहिरातीसाठी किंवा गणवेशाचा भाग म्हणून करता येत नाही, असे झाल्यास तातडीने कारवाई होते.
गाडीवर तिरंगा लावण्याचा अधिकार कोणाला आहे?भारतीय ध्वज संहितेनुसार, काही विशिष्ट आणि सन्माननीय व्यक्तींनाच त्यांच्या अधिकृत वाहनांवर तिरंगा लावण्याची परवानगी आहे. यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, राज्यपाल, नायब राज्यपाल, राज्यांचे मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, भारताचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांचा समावेश आहे.
रात्री पुरेसा प्रकाश असावातुम्हाला रात्रीच्या वेळीही गाडीवर तिरंगा ठेवायचा असेल, तर त्यावर पुरेशी प्रकाशयोजना असणे बंधनकारक आहे. जेणेकरून तिरंगा स्पष्ट दिसेल.