सीईओंच्या आदेशाला केराची टोपली
By Admin | Updated: July 28, 2014 23:22 IST2014-07-28T23:22:53+5:302014-07-28T23:22:53+5:30
ग्रामपंचायत कोसरा येथील तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी नाली उपसा व मलभा फेकण्याच्या कामात अपहार केला होता. उपहाराची रक्कम २९,९४० रुपये ग्रा.पं. फंडात जमा करण्याचे आदेश

सीईओंच्या आदेशाला केराची टोपली
भंडारा : ग्रामपंचायत कोसरा येथील तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी नाली उपसा व मलभा फेकण्याच्या कामात अपहार केला होता. उपहाराची रक्कम २९,९४० रुपये ग्रा.पं. फंडात जमा करण्याचे आदेश मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. भंडारा यांनी काढले होते. मात्र तीन वर्षापासून रक्कम जमा न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीमध्ये जनतेच्या करापासून जमा झालेला निधीच्या अफरातफरीच्या घटना वाढत आहेत. ग्रा.पं. सरपंच, सदस्य व ग्रामसेवक संगनमताने ग्रामपंचायत निधीची वाट कशी लावतात याचा नमुना ग्रा.पं. कोसरा येथे झाले. सन २००९-१० या वर्षात त्यावेळच्या सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी नाली उपसा व मलबा फेकण्यासाठी वापरलेल्या निधीमध्ये मोठा अपहार केला होता. यासंबंधात वरिष्ठांना तक्रार केल्यानंतर मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. भंडारा यांनी १ जुलै २०११ ला तत्कालीन सरपंच संजय रत्नपारखी, उपसरपंच राजू गभणे, ग्रामविकास अधिकारी आर.एम. धांडे व ग्रामसेवक एस.बी. भलावी यांची सुनावणी घेतली. त्यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेसमोर सर्वांनी आपले लेखी उत्तर पुरावे सादर केले होते. परंतु त्याने समाधान न झाल्याने मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. भंडारा यांनी नाली उपसा व मलबा फेकण्याच्या शासकीय कामासाठी निधीचा अपहार झाल्याने प्रत्येकी ७,४८५ रुपये असे एकूण २९,९४० रुपये ग्राम पंचायत कोसरा येथील सामान्य फंडात जमा करण्याचे आदेश ७ डिसेंबर २०११ रोजी दिले. आदेशानुसार सर्वांनी रक्कम फंडात जमा करणे आवश्यक होते.
परंतु अजूनपर्यंत अपहाराची रक्कम जमा झाली नाही. असे सध्याचे सरपंच हर्षवर्धन हुमणे यांनी सांगितले. खंडविकास अधिकारी पंचायत समिती पवनी यांनी देखील तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांना पत्र देऊन वसुलीची रक्कम सामान्य फंडात भरण्याचे पत्र दिले.
सरपंच यांनी देखील वसुलीची रक्कम भरण्याची लेखी सूचना दिली होती. मात्र रक्कम भरण्यात आली नाही. मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी आदेश पारीत केला. मात्र तीन वर्षानंतरही रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे पदाधिकारी, कर्मचारी, मुख्यकार्यपालन अधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवित आहेत. (वार्ताहर)