करडी पोलीस ठाणे मुहूर्ताच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: August 6, 2015 01:47 IST2015-08-06T01:47:29+5:302015-08-06T01:47:29+5:30
राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आबा पाटील यांनी जनतेला दिलेला शब्द पाळला. धडाडीचे निर्णय घेत सन २०१४ मध्ये करडी पोलीस चौकीला ठाण्याचा दर्जा देत मंजुरी दिली आहे.

करडी पोलीस ठाणे मुहूर्ताच्या प्रतीक्षेत
युवराज गोमासे करडी
राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आबा पाटील यांनी जनतेला दिलेला शब्द पाळला. धडाडीचे निर्णय घेत सन २०१४ मध्ये करडी पोलीस चौकीला ठाण्याचा दर्जा देत मंजुरी दिली आहे.
सन १९६२ पासून सातत्याने होणाऱ्या नागरिकांच्या मागणीला अखेर न्याय मिळाला. नागरिकांनी आनंद व्यक्त केला, आभार व्यक्त केला. परंतु एक वर्ष लोटला असताना ठाण्याच्या कारभाराला सुरूवात झालेली नाही. शासन व प्रशासनाला शुभारंभाचा मुहूर्त सापडलेला नसल्याने नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. ठाण्याच्या दृष्टीने पर्याप्त सोयी-सुविधा नाहीत.
करडी परिसर नक्षलग्रस्त क्षेत्रात मोडतो. कोका जंगल टेकड्यांचा पायथ्याशी वसलेल्या किरणापूर व केसलवाडा गावात सन १९९९ रोजी नक्षल कारवाया केल्याची नोंद पोलीस अभिलेखात आहे. सन १९६२ रोजी करडी येथे पोलीस चौकीची स्थापना केली. तेव्हापासूनच चौकीला नागरिकांनी विरोध दर्शविला. नागरिकांना पोलीस ठाणे हवे होते. मात्र तत्कालीन पुढाऱ्यांनी मागणीकडे दुर्लक्ष करिता चौकी निर्माण केली.
पोलीस चौकीचे कामकाज मोहाडी पोलीस ठाण्याला जोडण्यात आलेले आहे. नियंत्रण व गुन्ह्याची नोंद मोहाडी येथे करडी लागत असल्याने नागरिक व पोलिसांना नेहमी अडचणीचा व त्रासाचा फटका सहन करावा लागतो. त्याचबरोबर मोहाडी ठाण्याचे अंतर चौकीपासून ४० कि.मी. तर जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण ६० कि़मी. अंतरावर आहे.
गस्तीसाठी वाहनाअभावी अडचणी
चौकीच्या कार्यक्षेत्रात २७ गावे व ३७ चौरस कि़मी.चा परिसर आहे. मात्र चौकीसाठी वाहन व्यवस्था नाही. एकच दुचाकी आहे. पोलीस स्वत:च्या वाहनाने कर्तव्य बजावतात. मोठी घटना वा अपघाताच्या वेळी जखमींना वा आरोपींना ४० कि़मी. अंतरावरील मोहाडी येथे नेण्यासाठी खाजगी वाहनांची वाट पाहावी लागते. परिसरात ऐलोरा पेपर मिल व वैनगंगा शुगर कारखान्याचा परिसर आहे. करडी, पालोरा, मुंढरी, देव्हाडा आदी बाजारपेठेची ठिकाणे आहेत. चोरीच्या घटना घडत असतात. अशावेळी रात्रीची गस्त घालण्यासाठी सुद्धा अडचणींचा सामना करावा लागतो.
चौकी भाड्याचे घरात
सन १९६२ पासून पोलीस चौकी भाड्याच्या घरात आहे. सन १९८७ पर्यंत जामा मस्जिद परिसरात तर सध्या नामदेव आत्माराम कानतोडे यांचे घर किरायाने घेतले आहे. सन २०१३-१४ मध्ये पोलीस चौकी करिता कार्यालयीन इमारत व दोन निवासस्थानांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. समोरच्या भागातून आवारभिंतीचे बांधकाम झाले. मात्र पोलीस ठाण्याच्या दृष्टीने हवी असलेली कार्यालयीन इमारत व पर्याप्त निवासस्थाने निर्माणाच्या दृष्टीने प्रयत्न झालेले नाहीत.
आरोपींसाठी कोठडी नाही
करडी पोलीस चौकीच्या नव्याने बांधलेल्या इमारतीत आरोपींसाठी पर्याप्त सेल नाही. मोठी घटना व पोलीस कोठडीतील तपासाठी त्यामुळे अडचणी वाढणाऱ्या आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे आरोपींना ठेवण्यासाठी कोठडीची गरज आहे.