शाळा व्यवस्थापन समितीच्या आदेशाला केराची टोपली
By Admin | Updated: October 4, 2014 23:21 IST2014-10-04T23:21:48+5:302014-10-04T23:21:48+5:30
शासनाने मुख्याध्यापकावरील शालेय पोषण आहाराची जबाबदारी कमी करून ती महिला बचत गटांना देण्यात यावे या आदेशान्वये शाळा व्यवस्थापन समितीने सभा घेवून गटाची नियुक्ती केली.

शाळा व्यवस्थापन समितीच्या आदेशाला केराची टोपली
चिचाळ : शासनाने मुख्याध्यापकावरील शालेय पोषण आहाराची जबाबदारी कमी करून ती महिला बचत गटांना देण्यात यावे या आदेशान्वये शाळा व्यवस्थापन समितीने सभा घेवून गटाची नियुक्ती केली. मात्र गटशिक्षणाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करीत नसल्याने शाळा व्यवस्थापन समितीचा उपयोग काय असा प्रश्न समिती करीत आहे.
शासनाने मुख्याध्यापकावरील कामाचा कार्यभार लक्षात घेऊन त्यांचे कडील सोपविलेल्या शालेय पोषण आहाराची जिम्मेदारी कमी करण्यासंदर्भात शासनाने परिपत्रक जारी करून राज्यात अंमलबजावणी करण्याचे आदेश शाळेला देण्यात आले. त्यानुसार पवनी तालुक्यातील प्राथमिक शाळा खैरी येथे शाळा व्यवस्थापन समितीने गावात दवंडीद्वारे सूचना देऊन २ जुलैला सभा घेतली. या सभेत शारदा माता बचत गट खैरी, लक्ष्मी महिला बचत गट पंचशील महिला बचत गट व अहिल्याबाई महिला बचत गट उपस्थित झाले. त्यामुळे ईश्वरचिट्टीने महिलांची निवड करण्यात आली.
त्यात शारदा माता महिला बचत गटाची निवड करण्यात आली. त्या नुसार सदर गटांच्या महिला शाळेत आहाराचे काम देण्यात आले. मात्र त्यानंतर जुन्याच महिलांकडो मध्यान्ह भोजनाची जबाबदारी देण्याचे पत्र शाळेला पाठविण्यात आले. त्यानुसार जुन्या स्वयंपाकी व मदतनिस यांचे काम समाधान कारक नसल्याने त्यांना परत नियुक्ती देण्यात येवू नये असे सर्वानुमते ठराव घेण्यात आला. मात्र त्या पत्रात स्वयंपाकी यांचे काम समाधानकारक नसेल तर मात्र विहित प्रक्रियेचा अवलंब करून त्या ठिकाणी नवीन नियुक्ती देण्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीला कार्यवाही करता येईल असा स्पष्ट उल्लेख असतानाही व शाळा व्यवस्थापन समितीने दोन वेळा ठराव देवूनही गटशिक्षणाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावाला जुमनात नसल्याने सदर शाळेच्या मुख्याध्यापकाला मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावाची अंमलबजावणी न झाल्यास व पुन्हा जुन्या आहार शिजविणाऱ्या महिलांची नियुक्ती केल्यास शाळेला कुलूप ठोकून विद्यार्थ्यांच्या टी.सी. काढण्याचा इशारा पालकांनी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शामलाल खऊळ, निर्मला नान्हे, हर्षा तुपटे, सुनिता पारधी, माधुरी पारधी, छाया पडोळे, शिला ढेंगर, अशोक मांढरे, कैलाश मेश्राम, शेषराव कुथे, शालीनी आठवले व पालकांनी केली आहे.
(वार्ताहर)