जिल्ह्यात जम्बो कोविड सेंटर आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:36 IST2021-04-22T04:36:53+5:302021-04-22T04:36:53+5:30
जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजन प्लांटची गरज भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात १२०० ते १५०० ...

जिल्ह्यात जम्बो कोविड सेंटर आवश्यक
जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजन प्लांटची गरज
भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात १२०० ते १५०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारण्याची गरज असल्याची मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे. सोबतच जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची गरज असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात १२० ते १५० व्हेंटिलेटर बेड सुरू करण्याची मागणी पालकमंत्री विश्वजित कदम यांनी जिल्हा परिषद सभागृहात घेतलेल्या आढावा बैठकीत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.
जिल्ह्यात सध्या १२००० पेक्षा अधिक कोरोनाचे क्रियाशील रुग्ण आहेत. यापैकी अंदाजे १० टक्के म्हणजेच १२०० रुग्णांना दररोज ऑक्सिजनची गरज पडत आहे, यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र ऑक्सिजन प्लांटची व १२०० ते १५०० बेडच्या जम्बो कोविड सेंटरची गरज आहे, अशी मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे. यावर पालकमंत्री कदम यांनी तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यात १२००० पेक्षा अधिक क्रियाशील रुग्ण असताना संपूर्ण कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात ६९ व्हेंटिलेटर असून, त्यापैकी केवळ ३० सुरू आहेत. या स्थितीबाबत आ. भोंडेकर यांनी चिंता व्यक्त करीत तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात १२० ते १५० व्हेंटिलेटर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात यावेत आणि त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर नियुक्त करण्यात यावेत, अशी मागणी केली. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलेल्या मागण्या रास्त असून, तातडीने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन पालकमंत्री विश्वजित कदम यांनी या बैठकीत दिले.