रंजित चिंचखेडे लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा): बिनाखी येथील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन हर घर नल योजनेसाठी ७७ लाख ६४ हजार मंजूर करण्यात आले. नाल्याचे शेजारी योजनेचा पंपगृह बांधकाम करण्यात आले आहे. परंतु योजनेला विजेची जोडणी मिळाली नाही. भर उन्हाळ्यात योजनेचे पाणी गावकऱ्यांना मिळाले नाही. सोलर पंप मंजुरीसाठी ६ लाख ६२ हजार रुपये प्रस्तावित करण्यात आले असले तरी गावकऱ्यांनी भुवया उंचावल्या आहेत.
गावात नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. गावकऱ्यांना हीच नळ योजना गेल्या अनेक वर्षापासून पाणी पुरवठा करीत आहे. ही योजना कार्यान्वित असताना पुन्हा गावात जल जीवन मिशन हर घर नल योजना मंजूर करण्यात आली आहे.
योजनेला १३ फेब्रुवारी २०२३ ला सुरुवात करण्यात आली आहे. योजनेसाठी ७७ लाख ६४ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. योजनेचा पंपगृह नाल्याचे शेजारी बांधकाम करण्यात आले आहे. पंपगृह ते गावापर्यंत जलवाहिनीचे कामे करण्यात आली आहेत. नाल्यावर विहिरीचे बांधकाम करताना १९ लाख ३६ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.
रिचार्ज सॉप्ट ५ लाख ३९ हजार आणि पंपगृहच्या कामात २ लाख ७० हजार रुपये करण्यात आले आहे. उध्वनलिका उभारणीत सर्वाधिक ७ लाख ८४ हजार रुपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे.
गावात पिण्याचे पाणी घराघरात पोहचविण्यासाठी विवरण नलिका घालण्यात आले आहे. या कामात १४ लाख २३ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. परंतु जल जीवन मिशनच्या योजनेचे पाणी नळाला पोहचले नाही. याशिवाय पंपिंग मशिनरी १ लाख ६५ हजार रुपये, नळ जोडण्यासाठी १ लाख ५५ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. एवढेच नाही तर योजना चालविण्यासाठी ७८ हजार रुपयाचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या जुन्याच टाकीवर रंगरंगोटी करण्यात आली आहे. यात २ लाख ६५ हजार रुपये खर्च झाल्याची नोंद आहे.
"गावकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यास जल जीवन मिशन हर घर नल योजना तयार आहे. परंतु योजनेच्या पंपगृह पर्यंत अद्याप विजेची जोडणी पोहचली नाही. फक्त खांब उभे करण्यात आले आहे. यामुळे मे महिन्यात गावकऱ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे तत्काळ वीज जोडणी दिली गेली पाहिजे."- देवेंद्र मेश्राम, सरपंच, बिनाखी.