जयभीमच्या गजराने आसमंत दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 23:03 IST2019-04-14T23:03:00+5:302019-04-14T23:03:18+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी मिरवणूक काढून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. जयभीमच्या गजराने आसमंत दणाणून गेले होते. येथील त्रिमुर्ती चौकातील बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.

जयभीमच्या गजराने आसमंत दणाणले
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी मिरवणूक काढून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. जयभीमच्या गजराने आसमंत दणाणून गेले होते. येथील त्रिमुर्ती चौकातील बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.
भंडारा शहरासह जिल्हाभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह दिसत होता. प्रत्येक गावांत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आणि सायंकाळी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. भंडारा शहरातही सकाळपासून बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त उत्साह दिसत होता. सकाळी ११ वाजताच्या सुमारास मोटारसायकल रॅली काढण्यात आली. हातात पंचशील ध्वज घेतलेली तरुण-तरुणी या रॅलीत सहभागी झाले होते. बाबासाहेबांच्या नावाचा जयजयकार केला जात होता. शहरातील विविध मार्गावरुन या रॅलीने मार्गक्रमण केले.
शहरातील त्रिमुर्ती चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांच्या सकाळपासूनच रांगा लागल्याचे दिसत होते. श्वेत वस्त्र धारण करुन प्रत्येकजण बाबासाहेबांपुढे नतमस्तक होत असल्याचे दिसून येत होते. सायंकाळी नाशिकनगर परिसरातून अभिवादन रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध देखावे साकारण्यात आले होते. जयभीमच्या गजरात ही मिरवणूक शहरातील विविध मार्गातून त्रिमुर्ती चौकात पोहचली. या रॅलीमध्ये शहरातील विविध भागातील रॅली येवून सहभागी झाल्या होत्या.
देखणे देखावे
एका देखण्या रथात बाबासाहेब आणि माता रमाईचा जीवंत देखावा साकारण्यात आला होता. जणू बाबासाहेबच या रथात विराजमान असल्याचे भासत होते. संविधानाची प्रतिकृती, यासह बाबासाहेबांच्या विचारावर आधारीत देखावे या रॅलीत साकारले होते.