बनावट कागदपत्रावर आयटीआयमध्ये प्रवेश
By Admin | Updated: September 1, 2015 00:27 IST2015-09-01T00:27:20+5:302015-09-01T00:27:20+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा व्यवसाय प्रशासनाकडे कल आहे.

बनावट कागदपत्रावर आयटीआयमध्ये प्रवेश
प्रकरण लाखांदूर येथील : चौकशीकरिता उच्चस्तरीय समिती गठित
लाखांदूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा व्यवसाय प्रशासनाकडे कल आहे. त्यामुळे तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी शक्कल लढवून कागदपत्रात खोडतोड करून आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेवर मात देत प्रवेश मिळविला आहे. याप्रकरणाचा नागपूर येथील उच्चस्तरीय चमूने तपास हाती घेतला आहे.
लाखांदूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरली. येथून प्रशिक्षण घेतल्यानंतर नोकरीची आशा न बाळगता स्वयंरोजगारातून आर्थिक विकास साधून बेरोजगारीचा शाप पुसण्यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे ठरते. सदर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आठ ट्रेड द्वारा प्रशिक्षण दिल्या जाते. प्रवेश प्रक्रिया यापूर्वी सदर प्रशिक्षण केंद्रातून पार पडत असताना शासनाने मागील काही वर्षापासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु केली. प्रशिक्षणार्थ्यांना रिक्त जागा कमी अर्ज जास्त आल्याने कर्मचाऱ्यांनी शक्कल लढविली. आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला मात दिल्याचा प्रकार उघड झाला. विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश अर्ज दिल्यानंतर मुळ कागदपत्रांची छानी करण्याकरिता सदर संस्थेत तीन कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. यामध्ये प्राध्यापक पी.बी. भांगे, प्रा. पी.वाय. साकोरो, प्रा.बी.पी. चांदेवार या तिघांची आॅनलाईन अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांचे मूळ कागदपत्र तपासणी करण्याचे काम दिले होते. एक वर्षानंतर यातील ज्या विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. जवळपास १५ प्रशिक्षणार्थ्यांचे मुळ कागदपत्र व आॅनलाईन अर्ज सादर केलेले कागदपत्र यात मोठी तफावत असून त्यात खोडतोड असल्याचे उघडकीस आले.
माहितीनुसार, जास्त टक्केवारी असलेल्या मुलांना प्रवेश मिळाला नसल्याने व कमी टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश कसा काय मिळाला म्हणून उपसंचालक तंत्र व व्यवसाय मार्गदर्शन विभाग नागपूर येथे तक्रार केली. प्रथमदर्शनी तपास केला असता प्रवेश प्रक्रियेतील घबाड उघडकीस आले. यासाठी उपसंचालक विभाग नागपूर येथे चौकशी समिती गठीत करून संपूर्ण २०१४ मधील प्रवेश प्रक्रियेची तपासणी दोन दिवसात करण्यात येणार आहे. सन २०१४-१५ सत्रात बोगस कागदपत्रांच्या आधारावर ज्या १२ ते १५ विद्यार्थ्यांनी येथील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने प्रवेश घेतला त्यातील काही विद्यार्थ्यांचे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाले तर द्विवर्षीय प्रशिक्षण धारक प्रशिक्षण घेत आहेत. प्रवेश प्रक्रियेदरम्यान कागदपत्रांची छाननी करणाऱ्यांनी मुळ कागदपत्र का तपासली नाही. यात आर्थिक व्यवहार झाल्याचे आज बोलले जाते आहे. (तालुका प्रतिनिधी)
बनावट कागदपत्रांच्या आधारात आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला मात देऊन काही विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांसोबत संगनमत करून प्रवेश मिळविला. यासंदर्भात तक्रार करण्यात आली. उच्चस्तरीय समितीकडून चौकशी होणार आहे. त्यापूर्वी प्राथमिक तपासणी केली असता हे प्रकरण खरे असल्याचे निदर्शनास आले. चौकशीत दोषीवर कारवाई करण्यात येईल.
- अनिल कदम,
प्रभारी प्राचार्य लाखांदूर.