अपुऱ्या अव्यवस्थेमुळे धानाची पोती उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:35 IST2021-03-26T04:35:22+5:302021-03-26T04:35:22+5:30
रंजीत चिंचखेडे लोकमत न्यूज नेटवर्क चुल्हाड ( सिहोरा ) : धान उत्पादक असणाऱ्या पट्ट्यातील सिहोरा परिसरात गोडाऊनच्या अभावाने धानाचे ...

अपुऱ्या अव्यवस्थेमुळे धानाची पोती उघड्यावर
रंजीत चिंचखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड ( सिहोरा ) : धान उत्पादक असणाऱ्या पट्ट्यातील सिहोरा परिसरात गोडाऊनच्या अभावाने धानाचे पोती खरेदी केंद्रावर उघड्यावर ठेवण्यात आल्या आहेत. अवकाळी पावसाचा फटका धानाचे पोत्याना बसला आहे. अपुऱ्या अव्यवस्थेमुळे शेतकऱ्यांनाही नुकसान सहन करावे लागले आहे. परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांची थट्टाच करण्यात येत असल्याचा बाका अनुभव शेतकरी घेत आहेत.
सिहोरा परिसरात बारमाही सिंचनाची सोय असल्याने शेतकरी धान पिकांचे उत्पादन घेत आहेत. चांदपूर जलाशयाचे पाणी खरीप आणि उन्हाळी धान पिकांना वितरीत करण्यात येत आहे. उन्हाळी धान पिकांचे पाणी वाटपात रोटेशन पध्दत अंमलात आणले जात आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता तथा कर्मचाऱ्यांचे नियोजनबद्ध कृती आराखड्याने परिसरातील शेत शिवारात पाण्याचे वितरण करण्यात येत आहेत. यामुळे परिसरात धानाचे उत्पादन अधिक प्रमाणात शेतकरी घेत आहेत. हरभरा कडधान्याचे पीक अल्प प्रमाणात घेत असले तरी धानाचे उत्पादन विक्रमी घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. असे असले तरी या धानाला सुरक्षित करण्यासाठी शासन स्तरावरून उपाययोजना करण्यात येत नाहीत. खरीप आणि उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहेत. खरीप हंगामातील धान खरेदीने हाऊसफुल्ल असणारे खासगी गोडाऊन रिकामे करण्यात येत नाहीत. यामुळे तीन महिन्याचे अवधीत पुन्हा उन्हाळी धान खरेदी प्रक्रिया येत असल्याने संस्थाना पोती सुरक्षित करताना अडचणीत येत आहेत.
या परिसरात धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. धानाचे पोती उघड्यावर ठेवण्यात आली असली तरी बहुतांश पोत्याना वाळवी लागली असल्याचे चित्र आहे. उघड्यावर असणाऱ्या पोत्याची नासधूस जनावरे करीत आहेत. खरेदी केलेल्या धानाचे पोती शासनाच्या अखत्यारीत येत असले तरी बारदानाअभावी केंद्राबाहेर असणारे पोती शेतकऱ्यांची आहेत. या पोत्याची जनावरांनी नासधूस केली आहे. अवकाळी पावसाचा फटका या पोत्याना बसला आहे. चौफेर शेतकरी नागवला जात आहे. शेतकऱ्यांचे समस्या आणि प्रश्नावर सत्ताधारी व विरोधी बाकावरील नेतृत्व शिमगा साजरा करीत आहेत. परंतु गोडाऊननिर्मितीकरिता कुणी भांडतांना दिसून येत नाहीत. नेतृत्वच आटल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. सिहोरा परिसरात गोडाऊन नसल्याने विदारक चित्र निर्माण झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
बॉक्स
खाकेत कळसा अन गावाला वळसा
शासकीय इमारतीचे बांधकाम करताना जागेची समस्या येत आहे. परंतु जागेची समस्या गावात नाही. गावात आता सिमेंट रस्ता, नाली बांधकाम, सभामंडपचा अनुशेष नाही. ह्या बांधकाम मंजुरीचा अतिरेक होताना दिसून येत आहे. गावकुशीबाहेरील रस्ते सिमेंटची झाले आहेत. कंत्राटदार पांदण रस्तेही सिमेंटची करण्याचे नादात आहेत. गावात यालाच विकास म्हटले जात आहेत. परंतु शेतकऱ्यांची कायमस्वरूपी समस्या सोडवण्यासाठी गोडाऊन निर्मितीला विकासाचे श्रेणीत आणले जात नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाचा कहर सुरु होताच रडगाणे सुरू होत आहेत. खासदार, आमदारांचा स्थानिक विकास निधी गोडाऊन निर्मितीकडे वळते करण्याची मागणी होत आहे.