भाषिक कौशल्यासाठी नवोपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2016 00:49 IST2016-01-23T00:49:52+5:302016-01-23T00:49:52+5:30
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. यासाठी भाषण, संभाषण, वाचन व लेखन या चार मूलभूत कौशल्यांचा विकास गरजेचे आहे.

भाषिक कौशल्यासाठी नवोपक्रम
शेवटच्या दोन तासिका राखीव : ध्वनिक्षेपकावरून अभ्यास, शंकांचे होते सामूहिक निरसन
गिरीधर चारमोडे मासळ
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. यासाठी भाषण, संभाषण, वाचन व लेखन या चार मूलभूत कौशल्यांचा विकास गरजेचे आहे. कौशल्य आत्मसात केल्यास भाषेवर प्रभुत्व मिळविणे शक्य होते, ही संधी बालकांना उपलब्ध करुन देणे महत्वाचे आहे. ही बाब लक्षात घेवून सुबोध विद्यालयात प्राचार्य जी. एन. टिचकुले यांनी शाळेत नवोपक्रम राबविला आहे.
इंग्रजीसारख्या महत्वाच्या भाषेचे ज्ञान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावे व इंग्रजी विषयाचा अध्ययनातील अडसर दुर व्हावा यासाठी टिचकुले यांनी या नवोपक्रमाची सुरु केली आहे. त्यांनी सुरू केलेला उपक्रम वाखन्याज्योगा आहे.
उपरोक्त चारही मूलभूत कौशल्य विकसित करण्यासाठी वर्ग ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांना दररोज शेवटच्या दोन तासीका राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. यावेळी सर्व विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात एकत्र बसवले जातात. ध्वनिक्षेपणावरुन इंग्रजीमधील १० ते १२ ओळींचा अपठित उतारा, पत्र, कथा, विविध काठिण्य पातळीचे शब्द, शब्दसमूह व वाक्यांचे वाचन केले जाते. विद्यार्थी लक्षपुर्वक ऐकून विद्यार्थी त्यांचे टिपण वहीमध्ये करतात. क्षमतेनुसार विद्यार्थी कमी अधिक लिहिण्याचा प्रयत्न करतात.
श्रवण करुन लिहिलेल्या मजकुरावर नंतर विद्यार्थी क्षमतेनुसार प्रश्न विचारतात. विद्यार्थी उत्स्फूर्तपणे प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात. यामुळे एकाचवेळी सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन दिली जाते. यामुळे मुलांचे एकाचवेळी श्रवण, कथन, लेखन, वाचन या मुलभूत कौशल्यांचा विकास होण्यास मदत होते.
वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून विशिष्ट पध्दतीने अपठित उतारा व इतर लेखन साहित्याचा वापर केल्या जातो. लिखित उतारा त्यांच्याकडून वाचून घेतल्या जातो. शिक्षकांनी वाचन केलेल्या उताऱ्याचे विद्यार्थी काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रत्येक शब्दाशब्दांचे अनुकरण करतात.
शब्दातील विराम, चेहऱ्यावरील हावभाव, शारीरिक भाषा, डोळसपणे वाचणे, वाचनाचा उद्देश उच्चारातील विविधता, मूकअक्षरे आदींचा विचार वाचन कौशल्य विकसित करतांना केल्या जातो. आळीपाळीने सर्वच विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करताना, सर्वांनाच यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो.
भाषण-संभाषण कौशल्यावर विशेष भर देताना गटागटामध्ये विद्यार्थ्यांना आवडीचे विषय, व्यवहारातील प्रत्यक्ष अनुभव, इतर विषयांवर संभाषणासाठी प्रोत्साहित केल्या जाते. गटागटातून विद्यार्थी पाच-पाच, दहा-दहा मिनिटाचे सादरीकरण करतात. यावेळी इतर मनोरंजकपणे निरीक्षण करुन अपेक्षित चुका टाळण्याचा प्रयत्न करतात. अशाप्रकारे प्रस्थापित पारंपारिक पध्दतीपेक्षा वेगळा मार्ग अनुसरुन हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे.
यासाठी विद्यालयातील इंग्रजी शिक्षक एस. जी. हुकरे, सी. एस. नामुर्ते, जी. एस. चारमोडे, व्ही. टी. सार्वे, एन. एच. भुरे, डी. के. घुमुसकर, एच. के. वैद्य, व्ही. एल. कुथे यांची मदत आवश्यक ठरत आहे. खासगी महाविद्यालयातील प्राचार्य व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बौध्दीक क्षमतेत वाढ होण्यासाठी चालविलेला हा प्रयत्न आदर्श प्रयत्न ठरला आहे.