स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन तेवत राहील
By Admin | Updated: April 13, 2016 00:46 IST2016-04-13T00:46:47+5:302016-04-13T00:46:47+5:30
स्वतंत्र विदर्भाची मागणी रास्त आहे. या मागणीकरिता सरकार पाठ दाखवित आहे. राज्यातील भाजप सरकार विदर्भ देईल की नाही ही आता शंका उत्पन्न होत आहे.

स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन तेवत राहील
भंडारा येथे सभा : श्रीहरी अणे यांचे प्रतिपादन
भंडारा : स्वतंत्र विदर्भाची मागणी रास्त आहे. या मागणीकरिता सरकार पाठ दाखवित आहे. राज्यातील भाजप सरकार विदर्भ देईल की नाही ही आता शंका उत्पन्न होत आहे. या सरकारकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. विदर्भ वेगळा झाल्याशिवाय विकास शक्य नाही त्यामुळे विदर्भाचा हक्कासाठी हे आंदोलन तेवत राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले.
बहिरंगेश्वर मंदिराच्या प्रांगणात सोमवारला विदर्भाचा मुद्द्यावर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर माजी आमदार मधुकर कुकडे, आनंदराव वंजारी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, सुभाष कारेमोरे, भरत खंडाईत अॅड. समर्थ, अॅड. निरज खांदेवाले, संजय एकापुरे, प्रभाकर सपाटे, महेंद्र निंबार्ते हे उपस्थित होते.
अॅड. अणे यांनी १९८४ साली दांडेकर समितीच्या अहवालानुसार विदर्भात १२ कोटींचा बॅकलॉक होता. विदर्भात पैशा पश्चिम महाराष्ट्रात पळविला गेला. सन २००० मध्ये ईटीकोर बॅकलॉक समितीने आपला अहवाल सादर केला. त्यावेळी ६६०० कोटींचा बॅकलॉक होता. हा सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात खर्च करण्यात आला.
राज्य शासनाने विदर्भातील जनतेची दिशाभूल केली. सन १९६० साली विदर्भ महाराष्ट्राशी जोडण्यात आला. त्यावेळी काही करार करण्यात आले. त्यामध्ये कलम ३७१/२ मध्ये नऊ करार करण्यात आले. सन १९६० विदर्भातील लोकसंख्या २२ टक्के होती. विदर्भाच्या विकासासाठी २२ टक्के निधी खर्च केला जाईल. पण एकही वर्ष २२ टक्के निधी राज्य शासनाने दिला नाही. नोकरीमध्ये सुध्दा २२ टक्के दिल्या जातील पण असे कधीच झाले नाही.
केळकर समितीच्या अहवालानुसार मागील तीन वर्षात एकट्या पुणे विभागाचा विचार केला तर राज्य सरकारमध्ये ५०.२ टक्के नोकऱ्या पुणे विभागातील लोकांना देण्यात आले आहे. विदर्भातील नागपुर व अमरावती असे दोन विभाग मिळून राज्य सरकारमध्ये २.५टक्के नोकऱ्या मिळाल्या आहेत. एवढी मोठी तफावत दिसून येत असून सुध्दा सरकारने विदर्भात वेगळा करण्याच्या केवळ भुलथापा दिल्या आहेत.
विदर्भातील विणकर बेकार आहेत. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असतांना वेगळा विदर्भ झाला पाहिजे म्हणून ११७ आमदारांनी राजीनामे दिले होते. दरम्यान वेगळ्या विदर्भाला विरोध करणाऱ्या शिवसेनेचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील व वेगळा विदर्भ घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे प्रतिपादन अणे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र निंबार्ते यांनी केले. (शहर प्रतिनिधी)