साकोलीच्या नवतलावात वाढले अतिक्रमण
By Admin | Updated: July 27, 2015 00:43 IST2015-07-27T00:43:09+5:302015-07-27T00:43:09+5:30
निसर्गाचा असमतोलपना व शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना अस्तित्वात आणली.

साकोलीच्या नवतलावात वाढले अतिक्रमण
शासनाचा अजब कारभार : जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची नागरिकांची मागणी
साकोली : निसर्गाचा असमतोलपना व शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना अस्तित्वात आणली. यावर कोट्यवधींचा खर्च होत असताना जुन्या तलावातील अतिक्रमाणाकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. साकोलीच्या नवतलावाच्या परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे या तलावाची सिंचनक्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
एकोडी रोड ते नागझीरा रोडलगत नवतलाव आहे. सेंदुरवाफा, जमनापुर गावाचे पाणी नाल्याद्वारे या तलावात येते. हा तलाव भरल्यानंतर साकोली येथील गावतलाव भरल्या जातो. दोन्ही तलाव आकाराने व क्षेत्रफळाने खुप मोठे आहेत. या दोन्ही तलावाच्या पाण्याने जवळपासच्या शेतीला सिंचनाची सोय होते. मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे या तलावांची सिंचन क्षमता कमी झाली आहे.
सध्या नवतलावात नागझीरा रोडकडून अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अतिक्रमणाचे प्रमाण वाढतच आहे. मात्र याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पूर्वी हजारो एकर शेतीला सिंचनाची होणारी सोय आता अर्ध्यावर आली आहे.
शासनाने यावर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी नवीनच जलयुक्त शिवार योजना अस्तीत्वात आणली. यात तलाव खोलीकरण, नालेखोलीकरण, बंधारे व विहिरी खोदकाम करने, यावर कोट्यवधी रूपयाचा खर्च केल्या जात असला तरी जुन्या तलावाकडे दुर्लक्ष होत असून तलावातील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत आहे.
नवतलाव परिसरात वाढलेल्या अतिक्रमणाची दखल महसुल विभाग घेत नाही. या तलावात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे शेतीला सिंचनासाठी व गुरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दरवर्षी उद्भवतो. त्यामुळे या प्रकल्पाची चौकशी जिल्हाधिकारी यांनी करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)