बपेरा आंतरराज्यीय सीमेवरील राहुटीत असुविधा
By Admin | Updated: December 22, 2016 00:48 IST2016-12-22T00:48:40+5:302016-12-22T00:48:40+5:30
बपेरा आंतर राज्यीय सिमेवर पोलीस चौकी मंजुर करण्यात आली असली तरी येथे सुविधांचा अभाव आहे.

बपेरा आंतरराज्यीय सीमेवरील राहुटीत असुविधा
वीज, पाणी, शौचालयाची समस्या : चोरीच्या विजेचा वापर, कडाक्याच्या थंडीत पोलिसांची सेवा
चुल्हाड (सिहोरा) : बपेरा आंतर राज्यीय सिमेवर पोलीस चौकी मंजुर करण्यात आली असली तरी येथे सुविधांचा अभाव आहे. राहुटीतून सेवा बजाविताना कडाक्याचे थंडीत पोलिसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
बपेरा आंतरराज्यीय सिमा कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्तात ठेवण्यासाठी चौकी मंजुर करण्यात आली असून राहुटी उभारण्यात आली आहे. या राहुटीत तीन पोलीस शिपाई आणि एक पोलीस हवालदार व एक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. या राहुटीमध्ये सुविधांचा अभाव आहे. पोलिसांना रात्री आराम करण्यासाठी पलंग आहे, परंतु झोपायला गादी नाही. कागद आणि खड्ड्यांचा आधार घेवून आराम करण्याची पाळी आली आहे.
केंद्र आणि राज्य शासन शौचालय बांधकामार अधिक भर देत आहे. उघड्यावर शौचास बसण्यापासून नागरिकांना परावृत्त करण्यात येत आहे. परंतु या पोलीस चौकीत शौचालयाची सुविधा नाहीत. परिणामी पोलिसांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. सध्या परिसरात वाघांची गावागावात दहशत आहे.
अनेक गावकऱ्यांना वाघ गावांच्या दिशेने आढळला आहे. परंतु सिमेवरील पोलिसांना संरक्षण करण्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या नाही. २४ तास वाहनाची तपासणी सिमेवर करण्यात येत आहे.
वीज वितरण कंपनी मार्फत विजेची सोय करून देण्यात आली नाही. परिणामी महावितरणची वीज चोरी करून प्रकाश करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. चोर पकडण्यासाठी धडपडणाऱ्या पोलिसांवर वीज चोरी करावी लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
कायमस्वरूपी पोलीस चौकी मंजुरी मिळाली असताना इमारत बांधकाम हालचालींना जिल्हा पोलीस प्रशासनाने वेग दिला नाही. सिमेवर जागेचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. महसूल विभागाने बपेरा व देवसर्रा गावाच्या हद्दीत असणारी जागा पोलीस विभागाला दिली आहे. यामुळे जागेबाबत हिरवा कंदील प्राप्त झाला असताना बांधकामाचा मुहूर्त अद्याप काढण्यात आला नाही.
या आधी नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न अशी अवस्था झाली होती. पोलीस चौकीच्या इमारत बांधकामासाठी १५ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान इमारत बांधकामाचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रशासनाला पाठविण्यात आला आहे. परंतु या प्रस्तावावर अद्याप शिक्कामोर्तब झाला नाही, अशी माहिती मिळाली आहे. (वार्ताहर)
वाहनधारकांचा पळवाट शोधण्याचा प्रयत्न
सिहोरा पोलीस चौकी तैनात करण्यात आली असता अवैध व्यवसायीकांची पळवार शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेचा मध्यप्रदेश राज्याला जोडणारा धरण मार्ग व बपेरा आठवडी बाजारातून सुकडी मार्ग दाखल घेण्यास ही मार्ग पडवाट करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. यामुळे तपासणी नाक्यावर वाहनाची संख्या रोडावली असल्याचे दिसून येत आहे. धरण व आठवडी बाजार मार्ग बंद करण्याची गरज आहे.
सिमेवर सुविधांचा अभाव असला तरी सेवा प्रभावित नाही. वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. धरण व आठवडी बाजार मार्ग बंद केल्यास वाहन धारकांना पळवाट मिळणार नाही.
-जयप्रकाश मलेवार,
चौकी इन्चार्ज बपेरा.