नापासांसाठी पास होण्याची प्रोत्साहन योजना
By Admin | Updated: June 29, 2014 23:46 IST2014-06-29T23:46:51+5:302014-06-29T23:46:51+5:30
मानव विकास कार्यक्रमांतर्गत शिकवणी वर्गातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दोन हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याचा निर्णय शासनाच्या नियोजन विभागाने घेतला आहे.

नापासांसाठी पास होण्याची प्रोत्साहन योजना
राजू बांते - मोहाडी
मानव विकास कार्यक्रमांतर्गत शिकवणी वर्गातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दोन हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याचा निर्णय शासनाच्या नियोजन विभागाने घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील अतिमागास जिल्ह्यांचा निर्देशांक वाढविण्याच्या दृष्टीने १२५ तालुक्यात मानव विकासाचा कार्यक्रम जुलै २०११ पासून सुरु करण्यात आला आहे. शासन निर्णयान्वये राबविण्यात येत असलेल्या शिक्षणविषयक योजनांमध्ये दहावी व बारावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग सुरु करण्याची योजना आहे.
या योजनेत अनुतीर्ण विद्यार्थी लगतच्या परीक्षेला बसत असेल त्यांच्यासाठी मोफत शिकवणी वर्ग चालविले जात होते. यात वर्गात विद्यार्थी न येताही बरेच शिकवणी घेणारे शिक्षकांकडून शिकवणी घेत असल्याची माहिती शिक्षक विभागाला देत होती. यामुळे तीन वर्षात शिकवणी वर्गाचा सकारात्मक बदल दिसून आला नाही. त्यामुळे ४ जानेवारी २०१४ रोजी मानव विकास कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. त्यात मानव विकास योजनेअंतर्गतच्या शिक्षण विषयक योजनेच्या आर्थिक निकषांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव पारीत करण्यात आला. त्यानंतर नियोजन विभागाने इयत्ता दहावी व बारावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या ुविद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग सुरु करणे या योजनेच्या अनुषंगाने खर्चास मान्यता देण्यात आली.
मानव विकास अंतर्गत जिल्ह्यात मोहाडी, तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर या तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्गासाठी १० विद्यार्थी असणे बंधनकारक करण्यात आले आहे. एका वर्गामध्ये विद्यार्थी संख्या २२ झाल्यास त्याची विभागणी करून प्रतिवर्ग ११ विद्यार्थ्यांमागे एकुण दोन वर्ग करण्यात यावे असा निर्णय आहे.
आता पुढील मोफत शिकवणी वर्गासाठी जिल्हाधिकारी यांच्या अधिनिस्त जिल्हा निवड समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती शिकवणी वर्गासाठी १० वी गणित विषयासाठी ८० व इंग्रजी विषयासाठी १० विषयतज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती करणार आहे. तसेच १२ वी इंग्रजी विषयासाठी १० हंगामी शिक्षकांची तीन महिन्यासाठी निवड करण्यात आली आहे.
निवड होणाऱ्या दहावी व बारावीच्या प्रत्येक विषयाच्या शिक्षकास तीन महिन्यासाठी एकत्रित मानधन दिला जाणार आहे. एवढेच नाही तर प्रत्येक उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमागे विषय शिकविणाऱ्या शिक्षकास एक हजार रुपये मानधन दिला जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे ऊतीर्ण होण्यासाठी विद्यार्थी शिकवणी वर्गात येतो.
अभ्यास करतो, तो अभ्यास करणारा पास होण्यासाठी प्रोत्साहीत व्हावा व तो पुढे शिकवणी वर्गातून पास झाला तर त्या विद्यार्थ्यांस प्रत्येक विषयासाठी दोन हजार रुपये रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम दोन वर्षाच्या कालावधीसाठी बँकेत एफ.डी.आर. च्या स्वरुपात ठेवली जाणार आहे.
आता शिवणी वर्ग भरभरून चालणार आहेत. शिकवणी वर्गासाठी च्छिुक गणित, इंग्रजी विषयात शैक्षणिक व व्यवसायीक पात्रता पूर्ण करणाऱ्यांसाठी शासनाने संधी उपलब्ध करून दिली आहे. ५ जुलै पर्यंत इच्छूक शैक्षणिक पात्रताधारकांना शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद भंडारा येथे अर्ज करावयाचे आहेत. शासनाच्या या योजनेमुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी प्रोत्साहन तर मिळणार आहे शिवाय बेरोजगारांना हंगामी काम मिळवून देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.