‘आयसीटी’ उत्तिर्णांसाठी ‘एमएससीआयटी’ची गरज नाही
By Admin | Updated: March 9, 2016 01:36 IST2016-03-09T01:36:04+5:302016-03-09T01:36:04+5:30
इयत्ता नववी ते बारावी स्तरावरील आयसीटी अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एमएससीआयटी अभ्यासक्रम उत्तीर्ण करण्याची गरज नाही.

‘आयसीटी’ उत्तिर्णांसाठी ‘एमएससीआयटी’ची गरज नाही
विद्यार्थ्यांना दिलासा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा आदेश
देवानंद नंदेश्वर भंडारा
इयत्ता नववी ते बारावी स्तरावरील आयसीटी अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एमएससीआयटी अभ्यासक्रम उत्तीर्ण करण्याची गरज नाही. त्यांना या अभ्यासक्रमाचे सर्व फायदे मिळणार आहेत. असा आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच पारीत केला आहे.
राज्यातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये कार्यानुभव विषयांतर्गत माहिती तंत्रज्ञान हा विषय इयत्ता नववी व दहावीच्या स्तरावर अभ्यासण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच इयत्ता अकरावी व बारावी या स्तरावर माहिती तंत्रज्ञान हा विषय कला, विज्ञान व वाणिज्य या शाखांना अभ्यासकता येतो. द्विलक्षी अभ्यासक्रमाअंतर्गत संगणक शास्त्र व उच्च माध्यमिक अभ्यासक्रमात कॉम्प्युटर टेक्निक व मल्टीमीडिया अँड इंटरनेट टेक्नॉलॉजी हे विषय अभ्यासण्याची सुविधा उपलब्ध आहे. याचा राज्यातील असंख्य विद्यार्थी फायदा घेत आहेत. हे सर्व अभ्यासक्रम दोन वर्ष कालावधीचे आहेत.
या कालावधीत विद्यार्थ्यांना थेअरीसह प्रात्यक्षिकांचे सर्व ज्ञान प्राप्त होते. शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांना एमएससीआयटी हा अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना देखील हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध होत असतात. इयत्ता नववी व दहावीसाठी माहिती तंत्रज्ञान विषय अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना व अकरावी तसेच बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान संगणक शास्त्र, कॉम्प्युटर टेक्निक, मल्डीमीडिया अँड इंटरनेट टेक्नॉलॉजी हे विषय अभ्यासून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एमएससीआयटी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुन्हा उत्तीर्ण करण्याची आवश्यकता राहणार नाही. सदर अभ्यासक्रम महामंडळाच्या अभ्यासक्रमाशी समकक्ष समजण्यास शासनाने मान्यता दिली आहे.