सुखसंपन्न महाराष्ट्र घडवीन

By Admin | Updated: October 5, 2014 22:59 IST2014-10-05T22:59:17+5:302014-10-05T22:59:17+5:30

जीवनात संकटे येत असतात. त्यांना सामोरे गेले पाहिजे. घाबरायचे नसते. शिवसेना प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. त्यामुळे राज्यात कुणाची लाट आहे, हे येत्या १५ तारखेला मतदानातून

I will make a happy state | सुखसंपन्न महाराष्ट्र घडवीन

सुखसंपन्न महाराष्ट्र घडवीन

भंडाऱ्यात प्रचारसभा : उद्धव ठाकरे यांचे भावनिक आवाहन
भंडारा : जीवनात संकटे येत असतात. त्यांना सामोरे गेले पाहिजे. घाबरायचे नसते. शिवसेना प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. त्यामुळे राज्यात कुणाची लाट आहे, हे येत्या १५ तारखेला मतदानातून दाखवूनच द्या, असे सांगून सुखसंपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी शिवसेनेने योजना आखली आहे. या योजना तुम्हाला देणार आहे, परंतु ते मिळवायचे की नाही, हे आता तुम्हाला ठरवायचे आहे, त्यामुळे राज्यात शिवसेनेला सत्ता द्या, असे भावनिक आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
भंडारा येथे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख डॉ.दीपक सावंत, भंडारा जिल्हाप्रमुख राधेश्याम गाढवे, गोंदिया जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे, उपजिल्हाप्रमुख प्रशांत लांजेवार, उपजिल्हाप्रमुख सुनिल कुरंजेकर, लवकुश निर्वाण, हेमंत बांडेबुचे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, मला भारनियमनमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. शेतकऱ्यांना २४ तास वीज कशी द्यायची, बेरोजगारांच्या हाताला काम कसे द्यायचे, विद्यार्थ्यांना ओझेमुक्तीसाठी कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यायचे, अशा संपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी योजना तयार केली आहे.
त्या मुलींचा मृत्यू गूढच
मुरमाडीत तीन मुलींचा गूढ मृत्यू झाला. गेलेला जीव परत येणार नाही. परंतु मृत्यू कसा झाला हे सांगायला आघाडी सरकार तयार नाही. शेवटी सरकार म्हणते, त्या मुलींचा मृत्यू पाण्यात पाय घसरुन झाला. तुम्ही सांगा, या सरकारने महिलांना सुरक्षा दिली की वाऱ्यावर सोडले. गरीब जनतेची, शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांना हाकलून लावण्याची वेळ आली आहे.
युती का तुटली माहीत नाही
राज्यात २५ वर्षांपासून युती आहे. अचानक युती का तोडली हे सांगायला ‘ते’ तयार नाहीत. ३४ जागा अतिरिक्त मागितल्या. कशा देणार एवढ्या जागा. आजवर माझ्या शिवसैनिकांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या. त्यांच्या हक्काची जागा सोडून देऊन ‘त्यांना’ खुष करायचे, माझ्या शिवसैनिकांशी प्रतारणा करायची, हे कुणी सांगितलं. आजवर संकटकाळात शिवसेनेची गरज होती आणि आता ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ असे करणाऱ्यांना जनता माफ करणार, नाही. राज्यात आम्ही २८७ जागा लढत आहोत. बीडमध्ये एक जागा सोडलेली आहे. मुंडे-ठाकरे कुटुंबियांचे ऋणानुबंध आहेत. आम्ही ते जपले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: I will make a happy state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.