साकोली येथे घरातील धान पुंजण्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:35 IST2021-02-16T04:35:56+5:302021-02-16T04:35:56+5:30
साकोली : शहरातील गणेश वाॅर्डातील एका घरात असलेल्या धान व तणसीच्या पुंजण्याला अचानक आग लागली. नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न ...

साकोली येथे घरातील धान पुंजण्याला आग
साकोली : शहरातील गणेश वाॅर्डातील एका घरात असलेल्या धान व तणसीच्या पुंजण्याला अचानक आग लागली. नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न चालविला. दरम्यान, अग्निशमन दलाला पाचारण केल्याने आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविता आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
येथील लाखांदूर रोडवर गणेश वाॅर्डात डाॅ.नरेश कापगते यांचे घर आहे. या घरात धान आणि तणसाचे पुंजणे ठेवले होते. रविवारी दुपारच्या वेळी अचानक आग लागली. धूर बाहेर येत असल्याचे दिसताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरसेवक ॲड.मनीष कापगते, मीना लांजेवार यांनी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली. आग नियंत्रणात आली नसती, तर मोठा अनर्थ घडला असता. यावेळी माजी सरपंच महादेव कापगते, नगरपरिषद अग्निशमन दलाचे रामगोपाल सोनवाने, मुन्ना पठाण, संतोष दंतुलवार, अक्षय तिडके, सचिन कोहळे, राहुल तरजुले, सतीश लांजेवार, विष्णू कापगते, जयेश कापगते, भाविक लांजेवार यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. या आगीत दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
अग्निशमनची तत्परता
साकोली नगरपरिषदेकडे पूर्वी अग्निशमन दल नव्हते. त्यामुळे आग लागल्यास टँकरने पाण्याचा मारा करावा लागत होता, परंतु अलीकडेच अग्निशमन दल दाखल झाले. त्यामुळे परिसरात कुठेही आग लागली की, अग्निशमन दल तत्परतेने पोहोचते. यापूर्वी खैरलांजी शिवारात एका मालवाहू ऑटोरिक्षालाही लागलेली आग विझविली.