उकाड्याने जनजीवन प्रभावित
By Admin | Updated: April 30, 2015 00:38 IST2015-04-30T00:38:17+5:302015-04-30T00:38:17+5:30
एप्रिल महिना संपत आला असताना उन्हाचा तडाखाही वाढला आहे. शहराचे तापमान ४२.५ अंशावर पोहचले आहे.

उकाड्याने जनजीवन प्रभावित
रस्त्यावर शुकशुकाट : पारा ४२.५ अंशावर
भंडारा : एप्रिल महिना संपत आला असताना उन्हाचा तडाखाही वाढला आहे. शहराचे तापमान ४२.५ अंशावर पोहचले आहे. दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. आजारी रूग्ण, कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांसह चिमुकल्यांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मे महिन्यामध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यापासून तापमानात वाढ होत जाते. फेब्रुवारीनंतर खऱ्या अर्थाने उन्हाचे चटके बसण्यास सुरूवात होते. मात्र २०१३ पासून हवामानात अनपेक्षित बदल होऊन जानेवारी ते एप्रिलपर्यंत वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. त्यामुळे तापमानात खंड पडून दमट वातावरण जास्त राहिले आहे.
राज्यात गारपीट व पाऊस पडत असल्यामुळे तापमानाने उच्चांक गाठला नव्हता. मात्र, वैशाख महिना सुरू होताच तापमानाने ४२ अंश सेल्सियसचा पल्ला गाठला आहे. तो अद्याप स्थिर आहे.
या वर्षीचा सर्वाधिक उष्ण सप्ताह म्हणून त्याची नागपूर वेधशाळेने नोंद घेतली आहे. उन्हाचा चटका कायम असल्यामुळे त्याचा फटका बसत आहे. परंतु, आता तापमान वाढले तरच मान्सुन वेळेवर येईल, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, उन्हामुळे बच्चे कंपनी चांगली त्रस्त असून त्यांना खेळण्यासाठी सकाळ व संध्याकाळ हीच वेळ मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)
का वाढतेय तापमान?
सूर्याकडून जास्तीत जास्त किरणे पृथ्वीकडे शोषली जातात. पृथ्वीकडून उत्सर्जित केले जाणारे काही किरण वातावरणातून बाहेर पडतात, तर काही वातावरणातच अडकून राहत असल्याने तापमान वाढते. तसेच वाहनांची वाढती संख्या, ऊर्जानिर्मिती, बांधकामासाठी सिमेंट स्टीलचा वाढता वापर हे कारण आहे.
उष्णतेच्या लाटेत बाहेर पडताना डोक्याला पांढरा रूमाल बांधावा अथवा टोपी घालावी. डोळ्यांच्या बचावासाठी गॉगल, ग्लोव्हज वापरावेत. प्रवासात पाण्याची बॉटल बाळगावी. अतिथंड पेय सेवन करून नयेत. फळांचे भरपूर सेवन करावे. उन्हातून बाहेरून आल्यावर कुलरमध्ये बसू नये. रात्री कमी जेवण करावे.