कर्जबाजारी शेतकऱ्यांना बोनसची ‘आशा’
By Admin | Updated: August 7, 2015 00:44 IST2015-08-07T00:44:40+5:302015-08-07T00:44:40+5:30
आधारभूत धान खरेदी केंद्रात शेतकऱ्यांनी धान विकले. दोन महिन्यांच्या कालावधीनंतर शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले.

कर्जबाजारी शेतकऱ्यांना बोनसची ‘आशा’
व्यथा धान उत्पादकांची : खासगी व्यापाऱ्यांकडे विकलेल्या धानाचे काय?
संजय साठवणे साकोली
आधारभूत धान खरेदी केंद्रात शेतकऱ्यांनी धान विकले. दोन महिन्यांच्या कालावधीनंतर शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले. त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी पुन्हा सावकाराच्या जाळ्यात सापडला. आता सावकाराच्या जाळ्यातून निघण्यासाठी शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा असली तरी ज्या शेतकऱ्यांनी धान खासगी व्यापाऱ्यांना विकले त्यांना बोनस कसा मिळणार हाही एक प्रश्नच आहे. त्यामुळे अर्धे शेतकरी तुपाशी व अर्धे उपाशी असाच प्रसंग यावर्षीही शेतकऱ्यांवर आला आहे. त्यामुळे सरकारने कितीही बतावण्या केल्या तरी शेतकरी कर्जबाजारीच राहणार आहे हे येथे उल्लेखनीय.
मागील तीन वर्षापासून सततची नापिकी होत आहे. तरीही यावर्षी शेतकऱ्यांनी शेतीच्या हंगामात शेतीची कामे केली. मात्र यावर्षीही निसर्गाने दगा दिला.
सुरुवातीला आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा प्रफुल्लीत केल्या आणि निघून गेला. आताही बऱ्याच शेतकऱ्यांची रोवणी झाली नाही. खरीप व रब्बी पिकांचे आलेले धान शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रावर विकले. मात्र दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना चुकारे उशीराच मिळाले.
यावर्षी श्रीराम सहकारी भातगिरणी अंतर्गत खरीप व रब्बी या दोन्ही हंगामाचे मिळून ८३ हजार ८२४.८० क्विंटल धान खरेदी करण्यात आले. यात साकोली केंद्रातील ५३ हजार ८७७७ क्विंटल धानाचा तर विर्शी केंद्रातून ३० हजार ७३३७ क्विंटल धानखरेदीचा समावेश आहे. शासनाने यावर्षी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील धानाला २५० रुपये प्रतिक्विंटल बोनसची घोषणा केली असली तरी अजूनपर्यंत हा बोनस शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी या बोनसची प्रतीक्षा करीत आहेत.