गवराळ्यात पेटते ग्रामसफाई करून केरकचऱ्याची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST2021-03-28T04:33:11+5:302021-03-28T04:33:11+5:30
गवराळा या गावात किसनबाबा अवसरे महाराज यांचे वास्तव्य होते. ते मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील बेलगाव येथील रहिवासी. व्यवसायाने ते गवंडी ...

गवराळ्यात पेटते ग्रामसफाई करून केरकचऱ्याची होळी
गवराळा या गावात किसनबाबा अवसरे महाराज यांचे वास्तव्य होते. ते मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील बेलगाव येथील रहिवासी. व्यवसायाने ते गवंडी होते. गवराळा येथील हनुमान मंदिरात ते राहत असत. त्यांनी श्रमदानातून या परिसरातील अनेक गावांमध्ये मंदिरांचे बांधकाम केले. त्यांचा मितभाषी, मनमिळाऊ स्वभाव आणि धार्मिक वृत्तीमुळे ते परिसरात सुप्रसिद्ध होते. अशा या श्रमप्रतिष्ठेला चालना देणाऱ्या कर्मयोगी किसनबाबांचे १९ मार्च १९९२ रोजी निधन झाले. आपल्या जीवनयात्रेच्या अंतिम दिवशीही त्यांनी मंदिराचे अपूर्ण बांधकाम पूर्ण केले. तो दिवस होळीचा होता. त्या वेळी त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला अन् तेव्हापासूनच गवराळावासीयांनी होळी साजरी न करण्याचा संकल्प केला.
होळीच्या दिवशी पुरणपोळी, साखरेची गोड गाठी आणि धूलिवंदनाच्या दिवशी एकमेकांवर रंगांची उधळण करून सर्व जण मौजमजा करतात. परंतु, लाखांदूर तालुक्यातील गवराळा हे गाव या सर्वांनाच अपवाद ठरले आहे. येथे होळीच्या दिवशी कर्मयोगी अनासक्त ब्रह्मलीन किसनबाबा अवसरे पुण्यतिथी महोत्सव तर रंगपंचमीच्या दिवशी गोपालकाला आयोजित केला जातो.
गावात आजही होळी जाळली जाते. लाकडांची होळी पेटत नाही तर ग्रामसफाई करून गोळा केलेल्या केरकचऱ्याची होळी पेटते. गावातील कचऱ्यासोबत वाईट विचारसुद्धा येथील गावकऱ्यांनी जाळले आहेत, असे वाटते.
धूलिवंदनाच्या दिवशी ग्रामगीता तत्त्वज्ञान, ग्रामसभा, ग्रामस्वराज्य या विषयांवर अनुभवी लोकांचे गावाचा विकास साधण्यासाठी मार्गदर्शन मिळते. हा कार्यक्रम ग्रामगीताचार्य तुकारामदादा यांचे उत्तराधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या उपस्थितीत व संत-सज्जनांच्या सहवासात दरवर्षी होत असतो. या कार्यक्रमात गुरुदेव सेवा मंडळ तत्त्वज्ञान व ग्रामकुटुंब योजना राबवून ग्रामस्वराज्य संकल्पना ठरवली जाते. तीनदिवसीय कार्यक्रमात ग्रामगीता प्रवचन, कीर्तन, भजन, पालखी, प्रदक्षिणा, अवसरे महाराजांना मौन श्रद्धांजली यासह रक्तदान, नेत्र तपासणी यांसारख्या आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते.