पिंपळगावातील इतिहासप्रसिद्ध शंकरपट विस्मृतीत जाणार

By Admin | Updated: February 11, 2016 01:12 IST2016-02-11T01:12:40+5:302016-02-11T01:12:40+5:30

तालुक्यातील पिंपळगाव सडक येथील शंकरपट भंडारा जिल्ह्यातील एक कौतुकाचा व गौरवाचा विषय होता. गत ९७ वर्षापासून दरवर्षी वसंतपंचमीला शंकरपटाचे ऐतिहासिक ...

History of famous Pimpalpaw Shankarapatra will be forgotten | पिंपळगावातील इतिहासप्रसिद्ध शंकरपट विस्मृतीत जाणार

पिंपळगावातील इतिहासप्रसिद्ध शंकरपट विस्मृतीत जाणार

पटशौकिनांचा हिरमोड : शताब्दीकडील वाटचाल थांबली
चंदन मोटघरे लाखनी
तालुक्यातील पिंपळगाव सडक येथील शंकरपट भंडारा जिल्ह्यातील एक कौतुकाचा व गौरवाचा विषय होता. गत ९७ वर्षापासून दरवर्षी वसंतपंचमीला शंकरपटाचे ऐतिहासिक आयोजन व्हायचे. यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने शंकरपटावर बंदी घातल्याने शंकरपटासाठी प्रसिद्ध असलेला पिंपळगावचा शंकरपट आता इतिहासाचा भाग बनणार आहे. पिंपळगावचा सांस्कृतिक वारसा व वैभव यामुळे हरवले आहे.
पिंपळगावच्या शंकरपटाला इतिहास आहे. ३० नोव्हेंबर १९१९ ला येथील मालगुजार श्रीमंत चिंतामणराव घारपुरे यांचेकडे पुत्ररत्न जन्मास आले. सर्वांना अत्यानंद झाला. प्रतिष्ठीत मान्यवर मंडळी जमली, चर्चा सुरू झाली. हा आनंदोत्सव कसा साजरा करायचा. शेवटी शंकरपट भरवायचा यावर एकवाक्यता झाली. वसंत पंचमीचा मुहूर्त ठरला. पटाची जागा निश्चित झाली. श्रीमंतानी पटांची जागा १२ फेब्रुवारी १९२० ला वसंतपंचमीच्या शुभमूहूर्तावर शंकरपटाचा शुभारंभ झाला. याचदिवशी दान दिलेल्या दाणीवर पहली जोडी भरधाव पळाली. वसंतपंचमीचा मुहूर्त कायम राहिला. न्यायालयाने बंदी घातल्यामुळे यावर्षी दाणीवरून बैलजोडी सुटणार नाही. जुन्या आठवणीवर गावकरी वसंतपंचमीचा मुहूर्त साजरा करणार.
पिंपळगाव येथील शंकरपटात बक्षिसाची लयलुट होती. पूर्वी झेंडी आणि वेसनी बक्षिसात दिल्या जायच्या पिंपळगावच्या पटाची दान लांब पत्याची असायची. पटाची पूर्व पश्चिम लांबी १३३५ फूट ४४५ मीटर आहेत. एवढे नंतर कापायला बैलांची दमछाक होत असे. प्रथम या पटाची संपूर्ण व्यवस्था येथील मालगुजार गावकऱ्यांचे सहकार्याने स्वत: करीत असत. मागीलवर्षीपर्यंत पट समितीकडे जबाबदारी होती. या पटाच्या ९७ वर्षाच्या कालावधीत १९४४ ला रौप्य महोत्सव, १९६९ ला सुवर्ण महोत्सव व १९९४ ला अमृत महोत्सवाचे आयोजन धडाक्यात करण्यात आले होते. न्यायालयाने शंकरपटाला मान्यता दिली तर शंकरपटाची शतकी साजरी होणार आहे.
सन १९२० मध्ये सुरू झालेला शंकरपटाची नोंद शालेय पाठ्यपुस्तकामध्ये घेण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रात पिंपळगावचे नाव पोहचते होते. पहिल्या पिढीतले पिसाराम कमाने, शिवराम शिवणकर, महारू शिवणकर, जन्मुसाव, तात्या दिवानजी, साताराम कमाने, अ. गफूर शेख, हरबा कमाने, हळू भाजीपाले, रामजीबापू निनावे, सखाराम बोरकर यांनी पहिला पट भरविण्यात योगदान दिले. पटाची परंपरा सातत्याने टिकवून धरण्यामध्ये सदाशिव शिवणकर, देवजीबापू कमाने, रामाजी शेळके, गणेश सोहनी, तुळीशराम दोनोडे, काशीराम शिवणकर, केशवराव शिवणकर, गोविंदराव कमाने, अर्जुन मेश्राम, केशवराव घारपुडे, नत्थुजी तरोणे, भागवतराव कमाने, देवा हुकरे, श्रावण शिवणकर, पुंडलीकराव रोकडे, मो. इशाक शेख, दोनोडे, महादेव नवखरे, तेजराम कमाने, मोडकू रोहनकर, मोडकू बेहरे, सोविंदा मते, श्रावण शेळके, लांजेवार यांनी शंकरपटाची परंपरा कायम रहावी यासाठी योगदान दिले.
१९३० साली रा महात्मा गांधीनी सुरू केलेल्या अहिंसा चळवळीला जोर आला. तेव्हा पट समितीने बैलांना तुतारीने न टोचण्याचा निर्णय घेतला. कै. चिंतामणराव घारपुरे कट्टर ध्येयवादी व अहिंसावादी काँग्रेसी असल्यामुळे सन १९३०-३१ चा पट विना तुतारीने हाकलण्यात आला. दि.२८ ते २४ जानेवारी १९६१ ला पिंपळगावला शंकरपटनिमित्त विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते २२ जानेवारी १९६९ ला सुवर्ण महोत्सवी शंकरपटानिमित्त सुवर्ण पदकाचे बक्षिस देण्यात आले. १९७९ ला हिरक महोत्सवानिमित्त हिरकणी जडवलेली सोन्याची अंगठी प्रथम क्रमांकाच्या बैल जोडीस भेट देण्यात आली. १९७९ पूर्वी एक दिवसाचा शंकरपट दोन दिवसाचा करण्यात आला होता. अमृत महोत्सवी शंकरपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वसंतराव शिवणकर, रामकृष्ण घारपुरे, सम्मदभाई दामोधर शिवणकर, तुळशीराम तवाडे, गोमाजी शिवणकर, घनश्याम निनावे, ईस्तारी नवखरे, दौलत मडावी, प्रल्हाद तरोणे, गंगाराम नवखरे, लटारू नवखरे, कोलबा कोकोडे, महारू भाजीपाले, धनीराम शिवणकर, बळीराम शिवणकर, क्रिष्णा शिवणकर, नत्थू जिवतोडे, मारोती दोनोडे, रूळीराम कमाने, घनश्याम शिवणकर, रामकृष्ण दोनोडे, वामन तवाडे, हरीभाऊ दोनोेडे, तानाजी ढेंगे, जयवंत शेळके, गोविंदा नवखरे, गेंदलाल नवखरे, अविनाश कमाने, कृष्णा रोकडे यांनी अमृती महोत्सवी शंकरपट यशस्वी करून दाखविला.
शंकरपटाला तुर्तास बंदी असल्यामुळे गावकऱ्यांनी सरपंच श्याम शिवणकर यांच्या नेतृत्वात जलसा उत्सव, कबड्डी व रस्सीखेच स्पर्धांचे आयोजन केले आहे.
मनोरंजनासाठी मराठमोठया लावणी व रेंगेपार कोहळी येथे नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. पटाच्या दाणीवर कबड्डीचा फड रंगणार आहे.

न्यायालयाने बंदी घातल्यामुळे दरवर्षी वसंतपंचमीला पार पडणाऱ्या शंकरपटाचे आयोजन करता आले नाही. गावकऱ्यांचा उत्साहावर विरजन पडले. शंकरपटाची सांस्कृतिक परंपरा जीवंत ठेवण्यासाठी जलसा, खुली कबड्डी व रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन पटाचे दाणीवर करण्यात आले आहे. पुरूष व महिलांसाठी स्पर्धा आहेत. न्यायालयाने बंदी उठविल्यानंतर शतकोत्तर शंकरपट साजरा करण्याचा मानस आहे.
-श्याम शिवणकर, सरपंच, पिंपळगाव सडक़

Web Title: History of famous Pimpalpaw Shankarapatra will be forgotten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.