पालांदूर परिसरात समस्यांचा डोंगर
By Admin | Updated: July 17, 2015 00:38 IST2015-07-17T00:38:48+5:302015-07-17T00:38:48+5:30
परिसरात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. जनतेला अधिकारी, कर्मचारी दाद देत नाही. सामान्यमाणूस विकासाच्या व अधिकाराच्या कोसो दूर जात आहे.

पालांदूर परिसरात समस्यांचा डोंगर
पालांदूर : परिसरात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. जनतेला अधिकारी, कर्मचारी दाद देत नाही. सामान्यमाणूस विकासाच्या व अधिकाराच्या कोसो दूर जात आहे. सेवेची हमी देणारा नेता व अधिकारी मनमर्जीचा झाल्याने पालांदूर परिसरातील जनता रोष व्यक्त करित आहे.
राष्ट्रीय बँकेत, ग्रामीण बँकेत कर्जाचे पुर्नगठण करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. बचतखाते उघडायला येरझऱ्या घालाव्या लागतात. अधिकारी, कर्मचारी साधे बोलायला तयार नाही. वीज कार्यालयात एक ना अनेक समस्या जुन्याच आहेत, काळ बदलला पण पालांदूरचे कार्यालय मात्र समस्यांचे माहेरघरच आहे. विद्युत केंद्राची क्षमता वाढविणे, नविन वीज जोडणी देणे, खांब पुरविणे, कर्मचारी वाढविणे, दुहेरी पुरवठ्याची सोय करणे, उत्कृष्ठ दर्जाची साधने उपलब्ध करणे, अत्यंत महत्वाचे आहे.
नायब तहसीलदार कार्यालय ओस पडले आहे. अधिकारी येत नाही, विद्यार्थी वर्ग सत्ताधाऱ्यांवर नाराज आहे. तालुक्याला तहसीलदार कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता ही बाब जुनीच असून निवडणूकीत मिळालेले आश्वासन फोल ठरत आहे.
पालांदूर-लाखनी-भंडारा-नागपूर, पालांदूर-किटाडी-विरली, पालांदूर-मुरमाडी-पिंपळगाव आदी रस्त्यावर बसेसचा वाणवा आहे. खासगी वाहने जनावरे सारखे कोंबून अधिक पैशाच्या लालसेने प्रवाश्यांच्या जीवाशी खेळतात.
वाहतुक पोलीस, ठाणेदार चिरीमिरीत जाम खुश आहेत. पहाटेपासून रात्रीपर्यंत खुलेआम दारुचा महापूर वाहतो.
पालांदूर शैक्षणिक नगरी असल्याने कित्येक विद्यार्थी शिक्षणाकरिता इथे येतात. त्यांच्यावर अश्या गोष्टीचा नकारात्मक परिणाम व्हायला वेळ लागत नाही. तळीरामांची सकाळपासून भररस्त्यावर आणि वस्तीत धिंगाणा घालतात. यामुळे गावाची प्रतिमा मलिन होत आहे. गांधी चौक, बाजार चौकात शालेय वेळेत वाहुक पोलिसांची नितांत गरज असतांना डोळेझाक केले जाते. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षेमतेवर प्रश्नचिन्ह उमटत आहेत. कायदयाचा धाक उरला नसल्याने गुन्हेगार प्रवृत्ती बळावत आहे.
शैक्षणिक संस्था अनुदानीत असुनही प्रवेशाच्या नावावर मोठी रक्कम घेतली जाते. शाळेचा विद्यार्थी असुनही त्याला २००० रुपयाच्यावर रक्कम घेतली जाते. हे न्यायाला धरुन आहे का? असा प्रश्न पालकांना पडला आहे.
ग्रामीण रुग्णालयात वेळेत उपचार होत नाही. कर्तव्यात कसुर करुन खासगीत सेवा विकली जाते. दोन वेळेत रुग्ण तपासणी होत नाही. रुग्णकल्याण समिती कागदावरच लटकली आहे. आमदार महोदयांना वेळेच नाही. अश्यावेळी आम्ही जगायचे कसे असे भावनिक उद्गार परिसरातील जनता बोलत आहे. पशुवैद्य दवाखाान्यालाही कर्मचाऱ्यांचे जुनेच आजार असून कंपाऊडरच डॉक्टर म्हणून सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे.
पशुपालक संकटात असून खासगीतली सेवा महाग झाली आहे. किराणा दुकानातून वजनमापातून सामान्य ग्राहकांची लूट सुरुच आहे. हमी भाव केंद्रातून धान विकून महिन्याच्या वर कालावधी लोटला परंतू निधी (हूंडी) आलीच नाही. शेतकरी पुरता गरीबीत आला असून त्याच्या कैवारी दिसेनाशा झाला आहे. फक्त अधिवेश आणि अधिवेशनातच अधिक वेळ वाया जातांना जाणवतो. (वार्ताहर)